जेजुरी, (वार्ताहर)- कुलदैवत खंडेरायाच्या गडावर स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त वर्षातून एकदाच शिखरातील शिवलिंग व मुख्य मंदिराच्या भूगर्भात असलेले पाताळलोकीचे शिवलिंग उघडले जाते. विशेष म्हणजे जेजुरीच्या खंडोबा मंदिरातच शंकर आणि पार्वतीचे शिवलिंग येथे स्थापित आहे. त्यामुळे खंडोबा मंदिरात भाविकांना देवदर्शन घेण्याची पर्वणी मिळते.
शुक्रवारच्या दिवसाची सुरुवात होतानाच म्हणजे रात्री 12 वाजले नंतर शिखर लिंग व पातळ लिंग उघडण्यात आले. श्री खंडोबा देवाचे पुजारी सेवेकरी, मानकरी, जेजुरीकर ग्रामस्थ व देवसंस्थान विश्वस्त यांच्या हस्ते महाअभिषेक महाआरती करण्यात आली. रात्री अडिच्या सुमारास भाविकांना देवदर्शन खुले करण्यात आले.
शुक्रवार व शनिवार दोन दिवसात भाविकांना मुख्य गाभाऱ्यांमधील स्वयंभू लिंग व पातळ लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. यावेळी श्री मार्तंड देव संस्थान व पोलीस प्रशासनाकडून भाविकांना सुलभ दर्शन देण्यासाठी सुयोग्य प्रकारे नियोजन केले आहे. देव संस्थांकडून संपूर्ण दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, मंगेश घोणे, अभिजीत देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुख्य गाभारा, मंदिरास फुलांची सजावट
रांजणगाव गणपती येथील नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मुख्य गाभारा व मुख्य मंदिराला पानाफुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवाजी कोकाटे, हरिश्चंद्र फलके, आतिष सातव यांच्या वतीने फळे, फराळ वाटप केले. देवसंस्थानच्या वतीने अन्नसेवा कक्षात दिवसभर खिचडी वाटप करण्यात येत होती.
जेजुरी शहरातील ऐतिहासिक बल्लाळेश्वर मंदिराला बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लवथळेश्वर, साकुर्डे येथील शंकेश्वर, बोंबलेश्वर आदी शिवमंदिरातही देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.