“आरोग्य दूतां’ना संरक्षण कधी?

चिंचवड – डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन डॉक्‍टरांना संरक्षण देणारा कायदा 2010 ची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी भारतीय कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखालील डॉक्‍टरांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे गुरूवारी (दि. 25) केली.

इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये डॉ. मयुरी माटे, डॉ. प्रन्या खोसे, डॉ. कल्पना एरंडे, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. श्‍यामराव आहिरराव, डॉ. धनंजय पाटील, डॉ. प्रदीप ननवरे, डॉ. सत्यजीत पाटील, डॉ. महेश शेटे, डॉ. जिमेश मवाणी, डॉ. दिलीप जानुगड़े, डॉ. शेखर रालेभान, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. देवराज पाटील, डॉ. प्रदीप टाकळकर, डॉ. अक्षय आदींचा समावेश होता.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्‍टरांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्‍टरांना दुखापत आणि संबंधित रुग्णालयांचे नुकसान होत आहे. अनेकदा असे हल्ले डॉक्‍टरांच्या जिवावर बेतले जात आहेत. डॉक्‍टरांना संरक्षण देणाऱ्या या कायद्याचा अध्यादेश 28 एप्रिल 2010 मध्ये राज्य सरकारने जारी केला.

त्यानुसार कामावर कार्यरत असताना डॉक्‍टरांना मारहाण झाल्यास तीन वर्षे शिक्षा, 50 हजार रुपये दंड व रुग्णालयाच्या झालेल्या नुकसानीची दुप्पट भरपाई अशी तरतूद करण्यात आली होती. हा कायदा झाल्यानंतर देखील डॉक्‍टर व रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये कमी झाली नाही. मारहाण आणि हल्ला करणाऱ्या दोषींवर कारवाई होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

राज्यात विविध सरकारी महाविद्यालये, सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्‍टर्स तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे वैद्यकीय विद्यार्थी यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले होत आहेत. त्यांना मारहाण करण्याचे प्रकार उघडकीस येऊनही शासनाकडून अपेक्षित कारवाई होत नाही. सरकारने डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुरेशी तरतूद करावी. डॉक्‍टर, रुग्ण व नातेवाईक यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी तिन्ही घटकांनी पुढाकार घ्यावा.

– इरफान सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय कामगार सेना. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.