कोट्यवधी रुपये खर्च तरीही कचरा रस्त्यावरच

रवींद्र कदम
नगर – महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी मोठा गाजावाजा करून पुणे येथील स्वयंभू या संस्थेची नियुक्‍ती केली. कोट्यवधी रुपये या संस्थेला महापालिका देणार असली तरी आज कचरा रस्त्यावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कचरा संकलनासाठी संस्था नियुक्‍ती केल्यानंतरही नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 50 ते 60 वाहने कचरा संकलन करीत असल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे. परंतु प्रमुख रस्ते व चौक सोडले तर अन्यत्र कचऱ्याचे ढीग साठले आहेत.

महापालिकने तीन वर्षांसाठी शहर स्वच्छतेचा ठेका पुण्याच्या स्वयंभू या संस्थेला दिला. त्यासाठी महापालिका दररोज टनामागे 1 हजार 650 रुपये प्रमाणे दररोज 2 लाख 14 हजार रुपये मोजते आहे.तीन वर्षांला अंदाजे 23 कोटी 16 लाख 60 रुपये खर्च होणार आहे. अर्थात खासगी संस्थेची नियुक्‍ती केल्यानंतर महापालिकेची आर्थिक बचत होईल. असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा खर्च दरवर्षी 7 ते 8 कोटी होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा केवळ कचरा संकलनावर हा खर्च वाढला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या नावावर महापालिकेची उधळण सुरूच असल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील लोकसंख्याप्रमाणे कचऱ्याचे गणित काढले जाते. त्यानुसार प्रति व्यक्ती 300 ग्रॅम असे चार लाख लोकसंख्यासाठी दररोज शहरात 120 ते 140 टन कचरा शहरात साचला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट या खाजगी संस्थेला ठेका देण्यात आला असून सध्या या ट्रान्सपोर्ट कडून 55 वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येते. त्यासाठी मनपा या ठेकेदाराला 1 हजार 650 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहे.

महापालिकेने स्वयंभू बरोबर तीन वर्षाचा करार केला असून स्वयंभूने ही शहरात कचरा संकलन करण्यासाठी 40 घंटागाड्या, 10 कंटेनर, 5 कॉम्पॅक्‍टरद्वारे कचरा उचलला जात आहे. बुरडगाव येथील कचरा डेपो बंद असल्याने सध्या शहरातील सर्वकचरा हा सावेडी येथील कचरा डेपोत टाकण्यात येत आहे. दररोज अंदाजे 120 ते 130 टन कचरा शहरात साचला जात आहे. त्यासाठी स्वयंभूला महापलिकेकडून अंदाजे 2 लाख 14 हजार 500 रुपये, महिन्याला 64 लाख 35 हजार रुपये मोजावे लागणार आहे. तोच खर्च वर्षासाठी 7 कोटी, 72 लाख 20 हजार रुपये असा तीन वर्षासाठी 23 कोटी 16 लाख 60 हजार रुपये द्यावे लागणार आहे.

स्वयंभूला ठेका देण्याआधी महापालिका शहरातील कचरा संकलित करत असे. त्यासाठी महापालिकेला जास्त पैसे खर्च करावे लागत नसे. मात्र खाजगी ठेका दिल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाढला आहे. तसेच खर्च होवूनही शहरात ठिक-ठिकाणी कचरा पडून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासन स्वंयभू संस्थेकडुन शहरातील कचरा संकलन करुन घेणार का?.

पुण्याचा अनुभव स्वयंभूला ठरतोय कमी
पुणे शहरात ज्या पद्धतीने दैनंदिन कचरा संकलन केले जाते त्याच धर्तीवर नगर शहरातही दैनंदिन कचरा संकलनाचे काम सुरु करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील आम्ही दररोज 600 टन कचरा संकलित करतो. तसेच आम्हाला 5 वर्षाचा अनुभव असून, त्याधर्तीवर नगरचा कचरा संकलीत करण्यात येणार असल्याचे स्वयंभू संस्थेचे दुर्योधन भापकर यांनी सांगितले होते. मात्र, असे न होता शहरात ठिक-ठिकाणी कचरा तसचा पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्याचा अनुभव स्वयंभूला ठरतोय कमी असेच म्हण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.

शहराला 3 स्टार मानांकन मिळणार का?
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहराला 3 स्टार मानांकन मिळविण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण शहर कचरामुक्त होणे आवश्‍यक आहे. हे मानांकन मिळाल्यास शहराला मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र सरकारकडून मिळेल मात्र शहरात असाच कचरा राहिलातर 3 स्टार मानांकन मिळेल का असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांचे झाले दुर्लक्ष
रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा, मातीचे ढिग उचलले जाणार आहेत. ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वेगवेगळे संकलन केले जाणार आहे. हॉटेल व बाजारपेठेतील दुकानदारांचा कचरा रात्रीच संकलित केला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी 250 डस्टबिन ठेवले जाणार आहेत. शहरात दिवसभर कचऱ्याचे संकलन सुरु राहणार असून कचरामुक्त शहर करण्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी म्हटले होते. मात्र त्यांचेही दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)