8 सोसायटी धारकांवर दंडात्मक कारवाई
औंध – “स्वच्छ सर्वेक्षण-2020′ अंतर्गत औंध क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रत्यक्ष भेट देऊन सोसायटीमध्ये जमा होणारा ओला कचरा सोसायटी परिसरातच कंपोस्ट करून जिरविणे व सुका कचरा रॅग पिकर्स संस्थेच्या कचरावेचकाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सूस रोड परिसरातील सोसायटी धारकांनी व्हर्मी कंपोस्ट प्रकल्प कार्यान्वित केलेले नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या आदेशानुसार व औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 8 सोसायटी धारकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 40 हजार रुपये दंड वसूल केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकून अस्वच्छता करणाऱ्या 2 नागरिकांकडून 25,000 रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे, आरोग्य निरीक्षक जालिंदर चांदगुडे, निखिल निकम, नितीन लोखंडे, जया सांगळे, राजेंद्र वैराट, योगेश जाधव, कविता निम्हण, श्वेता चौधरी यांनी केली.