ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या खिशाला दुधाचा चटका

दूध खरेदी दरात 2 रुपये कपात

पुणे – गायीच्या दुधाला प्रतिलिटरला देण्यात येणाऱ्या तीन रुपये अनुदान योजनेची मुदत संपल्याने त्याचबरोबर नव्या अनुदानावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे दूध खरेदी दरात 2 रुपये कपात करुन 23 रुपये करण्याचा निर्णय सहकारी व खासगी दूध संघाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. या निर्णयाचा भुर्दंड हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

गायीच्या दुधाला राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची मुदत दि.30 एप्रिल (मंगळवारी) रोजी संपली. त्यानंतर नव्याने अनुदान लागू करण्याबाबतची सूचना शासनाकडून मिळालेली नाही. 3 रुपये अनुदान मिळाल्यामुळे दूध संघ शेतकऱ्यांकडून 25 रुपये लिटरने दूध घेत होते, पण आता अनुदान नसल्याने 2 रुपये कपात करुन म्हणजे 23 रुपयांनी दूध घेतले जाणार आहे.

यासंदर्भात सहकारी व खासगी दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात हा निर्णय ऐन दुष्काळात घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या गायीच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर निश्‍चित केला. त्यामधील 3 रुपये अनुदान राज्य सरकारकडून संघांना दिले जात आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण प्राप्त झाले नसल्याचे पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

खरेदी दरात लिटरला दोन रुपयांनी कपात करून 1 मे पासून हा दर 23 रुपये करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे, तर 8.5 एसएनएफपेक्षा प्रति पॉइंटला 1 रुपयांची करण्यात येणारी कपात यापुढे 8.4 एसएनएफला 40 पैसे केली जाईल. दूध पावडरचा दर किलोस 215-220 रुपये, तर लोण्याचा दर 240 ते 250 रुपये असल्याचेही सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.