सातारकर झाले घामाघूम

वाढत्या उकाड्याला खंडित वीजपुरवठ्याचा हातभार

सातारा –
एका बाजूला सूर्य आग ओकत असताना उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांचा मंगळवारी चांगलाच घामटा निघाला. मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित राहिल्याने संपूर्ण दिवस फॅन शिवाय काढावा लागला. त्यामुळे सातारकरांची अवस्था धड सांगता ही येईना अन बोलता ही येईना, अशी झाली होती.

मागील दोन महिन्यांपासून दर मंगळवारी विद्युत पोल व उपकरणांच्या दुरुस्तीसाठी तसेच धोकादायक झाडांच्या फांद्या दूर करण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली होती. अशातच मंगळवारी सकाळपासूनच शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सातारकर चांगलेच घामाघूम झाले होते. त्यातच हवा वाहण्याचे प्रमाण कमी होते. वातावरण पुर्णत: दमट झाले होते. बाहेर कडक ऊन आणि घरातही उकाडा अशी परिस्थिती झाल्याने दूपारच्या वेळेत घरामध्ये थांबणे देखील असह्य झाले होते. त्यामुळे अनेकांनी परिसरातील झाडांचा आसरा घेतला होता. मात्र, खासगी आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल झाले होते.

दरम्यान, मागील मंगळवारी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यादिवशी वीज वितरणाने वीजपुरवठा खंडित केला नव्हता. त्यामुळे थोडा फार दिलासा त्यादिवशी मिळाला होता. साहजिकच त्यामुळे सातारकरांनी प्रत्येक मंगळवार मतदानाचा दिवस असावा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.