कुकाण्यातील अतिक्रमणे हटविण्याचा बनाव केल्याची न्यायालयात तक्रार
कुकाण्यातील बसथांबा परिसरातील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण
निवडणुकीच्या काळात अतिक्रमणांचा विषय आला ऐरणीवर
नेवासे – कुकाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचा बनाव केल्याची तक्रार केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम नेवासा उपविभागाच्या उपअभियंत्यास नोटीस बजावली आहे. यामुळे कुकाणा बसथांबा व परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ऐरणीवर आला आहे. यामुळे अतिक्रमण धारक व सरकारी यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
कुकाण्यातील सामजिक कार्यकर्ते एकनाथ कचरे यांनी कुकाण्यातील बसथांबा परिसरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रत्यक्षात या विभागाकडून कार्यवाही झालीच नाही. 2010 पासून कचरे यांचा हा एकाकी लढा सुरू आहे. दरम्यान बांधकाम खाते दाद देत नसल्याने कचरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऍड. विनोद पाटील यांचे वतीने बांधकाम विभागाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली.
दरम्यान गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने कचरे यांच्या याचिकेवरून सरकारी यंत्रणेस संबंधीत जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश दिला. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमणे न हटवता हटविल्याचा बनाव व देखावाच केल्याची तक्रार कचरे यांनी पुन्हा अवमान याचिकेव्दारे न्यायालयात ऍड.विनोद पाटील यांचे मार्फत केली. त्यामुळे गेल्या आठवडयात औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयाकडून अवमान याचिकेवरून पुन्हा जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना नोटीस बजावली आहे.
अतिक्रमणे हटविण्यासंबंधी बांधकाम विभागाकडून देखावा व बनाव करण्यात आल्याने तशी तक्रारही केली आहे. तसेच उच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आलेली असून सरकारी यंत्रणेने न्यायालयाचीही दिशाभूल चालविली आहे.
एकनाथ कचरे याचिकाकर्तेकुकाण्यातील अतिक्रमणांसंबंधी केवळ बनाव केल्याने न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तसे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिलेले आहे. उच्च न्यायालयाकडून संबंधितांना अवमान याचिकेविषयी नोटीस बजावली असून पुढील आठवड्यात सुनावणीही आहे.
ऍड. विनोद पाटील