गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई

दीड हजारावर अधिकाऱ्यांनी घेतले निवडणुकीचे प्रशिक्षण

कराड – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि. 31 मार्च रोजी येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षणासाठी तालुक्‍यातून सुमारे दीड हजाराहून अधिकारी उपस्थित होते. मात्र अनुपस्थित राहणाऱ्या 120 अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी दिल्या आहेत.

कराड दक्षिण 260 विधानसभा मतदार संघ व 259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघ या मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 1 हजार 616 केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण दोन सत्रात नुकतेच पार पडले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरदिप वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीसाठी कराड उत्तरमधील विधानसभा मतदार संघातील 874 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 861 कर्मचाऱ्यांची अशा एकूण 1 हजार 735 केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या सत्रातील प्रशिक्षणास कराड उत्तरमधील नियुक्त एकूण 874 कर्मचाऱ्यांपैकी 824 कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली. तर पन्नास कर्मचारी गैरहजर राहिले. तसेच दुसऱ्या सत्रात कराड दक्षिणमधील नियुक्त एकूण 861 कर्मचाऱ्यांपैकी 712 कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली व 69 कर्मचारी गैरहजर राहिले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण पार पडले. या दरम्यान, शिवाजी हायस्कूल येथे दोन्ही मतदार संघासाठी उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशीनबाबत प्रथम पीपीटीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर इव्हीएम मशीन प्रिप्रेशन करणे, व्हीव्हीपॅटबाबत असलेली माहिती देण्यात आली. तसेच गैरहजर राहणाऱ्या सुमारे शंभरावरील कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात
आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.