“अल्काईल’ कायमस्वरूपी बंद करावी

सरपंच राहुल भोसले ः कुरकुंभ ग्रामसभेत ठराव मंजूर

कुरकुंभ- येथील औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीतील गोडाऊनला बुधवारी (दि.14) लागलेल्या आगीमुळे कुरकुंभकरांना भीतीपोटी गाव सोडावे लागले होते. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून, आधीही अशा घटना वारंवार घडत असल्याने ग्रामसभेत अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कुरकुंभ येथे सरपंच राहुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि. 16) ग्रामसभा पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुरकुंभच्या औद्योगिक परिसरात कायमच छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा आवाज उठवला आहे; पण त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. बुधवारी (दि. 14) “अल्काईल’ या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवार (दि. 16) एक दिवस कुरकुंभ गाव बंद ठेवण्यात आले होते. आगीच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ गाव खाली करावे, यांसारख्या सूचना येऊ लागल्याने प्रत्येक जण अंगावरील कपड्यानिशी जिवाच्या अकांताने पळत होता. यावेळी औद्योगिक परिसरातील प्रशासनाने कोणतीही समयसूचकता दाखवली नाही. प्रशासन आता काही दिवस सजग असल्याचे दाखवून देईल; परंतु पुन्हा परिस्थिती “जैसे थे’ राहील. यामुळे ग्रामस्थांनीच ही आणि यांसारख्या धोकादायक कंपन्या बंद करण्याबाबत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. याप्रसंगी उपसरपंच सूर्यकांत भागवत, सदस्य आयुब शेख, उमेश सोनवणे, झाकीर शेख, विनोद शितोळे, विजय गिरमे, भामाबाई दोडके, शुभदा शितोळे, पुष्पा पवार, सायरा शेख, सुनीता चव्हाण, अपर्णा साळुंके, ग्रामसेवक टी. व्ही.जगताप, जावेद मुलाणी, रफिक शेख, सनी सोनार, संदीप भागवत, सुनील पवार, नीलेश भागवत, संजय शितोळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 • जनांदोलन करणार
  कुरकुंभ गावात एमआयडीसी आल्यामुळे खूप काही गोष्टी उपलब्ध झाल्या असल्या तरी गावाने या बदल्यात खूप काही गमावले आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक बाबी मांडल्या आहेत, त्या पूर्ण नाही झाल्या तर प्रसंगी मोठे जनांदोलन उभे केले जाईल, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे.
 • या आहेत ग्रामस्थांच्या मागण्या
  – “अल्काईल’सारख्या अत्यंत धोकादायक कंपन्या तात्काळ बंद कराव्यात.
  – गावात कोणतीही नवीन कंपनी यायची झाल्यास जनसुनावणी घेऊन,
  – ग्रामपंचायतीचे “ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक असावे.
  – एमआयडीसीमधील कंपन्यांनी गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आणली आहे. गावाला पिण्याचे व वापरायचे पाणी मोफत द्यावे. ही पाणीपट्टी एमआयडीसीने द्यावी अथवा कंपन्यांकडून ग्रामपंचायतीने वसूल करावी.
  – महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे व महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा विभागाचे एमआयडीसी कुरकुंभ येथे नियमित कार्यलय अधिकाऱ्यांसह सुरू करावे.
  – आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसीची अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा उपलब्ध असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)