धनगरांना आरक्षण मिळवून देणारच – महादेव जानकर

सांगली – धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे. यासाठी सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी कमिशनला या आधी घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असेही त्यांनी सांगितले.

सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी मंत्री जानकार यांनी धनगर आरक्षणबाबत भाजप आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
जानकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर आहे. याबाबतचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. शिफारस करण्याबरोबर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण आग्रही आहोत. त्याचबरोबर धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. आता राजकीय आरक्षण हे बाकी आहे. त्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याआधी देशातील ओबीसी कमिशनला कोणताही घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र एनडीएच्या बैठकीत आम्ही मागणी केली आणि नरेंद्र मोदी यांनी ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा दिला आहे. त्याच बरोबर धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून 1 हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)