संशयितांमध्ये जवानाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सुट्टीवर आला अन् अडकला
यातील संशयित अजित फाळके हा भारतीय सेनेत गेली सहा वर्षे जवान म्हणून कर्तव्य बजावत आहे. तो नुकताच सुट्टीवर आपल्या गावी आला होता. मात्र मित्रांच्या नादाने त्याने कुरिअर बॉयला लुटण्याची चूक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सातारा – साताऱ्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुरिअर बॉयचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेला चोवीस तास उलटण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजित विजय फाळके (रा.सातारा रोड) राजेश विलास कांबळे, निखील प्रकाश वाघमळे (दोघे रा. अंबवडे (सं) ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे यातील फाळके हा भारतीय सेनेत जवान म्हणून कर्तव्य बाजवत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी साताऱ्यात कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या शैलेश सुर्यकांत भोकरे (रा. चिमणपुरा पेठ,सातारा) हे साताऱ्यातील उपनगरात नेहमीप्रमाणे कुरिअरची डिलिव्हरी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान शहरातील एलबीएस कॉलेज जवळ फाळके, कांबळे, वाघमळे यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्याकडीळ एक घड्याळ व कुरिअरची काही पार्सल हिसकावली. त्यानंतर राजेश कांबळे याने तक्रारदाराला त्याच्याच दुचाकीवर जबरदस्तीने बसवुन ढोर गल्लीमार्गे शहरातील नवीन यशवंत हॉस्पिटल येथे नेले.
हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली दुचाकी थांबवली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या फाळके व वाघमळे या दोघांनी भोकरे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व पळून गेले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने बुधवारी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.