…तर संपूर्ण पाभे गाव पाण्याखाली जाईल

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण : बंधाऱ्याचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करा

राजगुरूनगर – पाभे (ता. खेड) येथील पूल कम बंधाऱ्याचे प्रशासनाकडून केवळ वरचे गेट (ढापे) काढण्यात आले. खालील दोन थराचे (दोन लाईन सुमारे 4 फूट) काढले नसल्याने जोराच्या पावसात पाभे गावात पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात भीमा नदीला पूर आला, त्यावेळी गावात पाणी घुसले होते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यास संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या पुलालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा, अशी मागणी पाभे ग्रामस्थांनी केली आहे.

भीमा नदीच्या कडेला सुमारे 100 कुटुंबे असलेले पाभे गाव वसले आहे. या गावाला जाण्यासाठी आणि पाभे, भोमाळे व टोकावडे या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून धरणांतर्गत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पूल कम बंधारा बांधला आहे. गेली अनेक वर्षांचा जाण्यायेण्याचा आणि पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. दरवर्षी या पुलाला गेट (ढापे) बसविण्यात येतात. पावसाळ्यापूर्वी ते पूर्णतः काढण्यात येतात. यावर्षी प्रशासने ढापे बसवले मात्र पुलाचे संपूर्ण ढापे (गेट) काढले नाहीत. त्यामुळे या पुलाच्या गेटमुळे मोठा पाणीसाठा नदीपात्रात झाला आहे.

अर्धवट काढलेल्या गेटमुळे भीमा नदीच्या प्रवाहाचे पाणी आडून आहे. अडलेले पाणी आणि अतिवृष्टी झाल्यास नदीला आलेला पूर यामुळे पुलाचे पाणी पाभे गावात शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सध्या भीमाशंकर, भोरगिरी परिसरात जोराचा पाऊस सुरु आहे. भीमानदीला पूर येत आहे, या पुराचे पाणी पाभे बंधाऱ्यात अडले जात आहे. त्यामुळे मोठा फुगवटा बंधाऱ्याच्या वरच्या नदीपात्रात होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नदी कडेच्या खाचरात पाणी साठत आहे. त्यामुळे त्यांना भात पिकाची लावणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढले आणि दरवर्षी सारखी अतिवृष्टी झाली तर पाभे गावातील पुलाला धोका होईलच, शिवाय पाभे गावात पाणी घुसल्याने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका होणार आहे.

येथील पुलाचे ढापे काढण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा भेटून पत्रव्यवहार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन ढापे यांचा थर काढला नाही. सुमारे 4 ते 5 फूट पाणीसाठा कायम असल्याने पुराच्या काळात हे धोक्‍याचे असल्याने ते तात्काळ काढावेत. पूल आणि नागरिकांना उद्‌भवणारा धोका टाळण्यात यावा, अशी अशी मागणी पोलीस पाटील संदीप कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मराडे, किसन जफरे, रामदास मराडे यांच्यासह ग्रामस्थ करीत आहेत.

पाभे आणि भोमाळे गावातील बंधाऱ्यांचे ढापे अर्धवट काढले आहेत. भोमाळे येथील बंधाऱ्याचेही तळाचे ढापे काढणे बाकी आहे. भीमा नदीला पूर आला तर पुलाला धोका पोहोचणार आहे. शिवाय पाभे गावात पाणी घुसण्याची शक्‍यता आहे. चास कमान धरण प्रशासनाकडे पुलाचे ढापे काढण्याची मागणी केली आहे; मात्र अजूनपर्यंत त्यावर कारवाई झाली नाही.
– सुधीर भोमाळे, सरपंच भोमाळे


पाभे येथील पूल कम बंधाऱ्याचे काही ढापे काढले आहेत. मुख्य प्रवाह असलेल्या ठिकाणाचे ढापे काढले आहेत; मात्र बाजूचे राहिले आहेत सध्या पाऊस सुरु असल्याने ते काढणे अवघड झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी होताच ते काढण्यात येतील.
– उत्तम राऊत, शाखा अभियंता चास कमान धरणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)