मनात राहिलेली शाळा…!

“शाळा”….हा काही शब्द नाही तर मानवी जीवनाला जिवंतपणा आणत समाज परिवर्तनाचा महत्वपूर्ण घटक आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यात कुटुंब संस्थेनंतर शाळा ही एक महत्वाची संस्था. अशीच माझी एक शाळा, “होली स्पिरिट अंजली शाळा”.

नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्‍यातील कोठारी या छोट्याशा गावातील ही एक शिक्षणसंस्था. एका ख्रिश्‍चन मिशनरी मार्फत ही शाळा चालवली जायची.खरं सांगायचं तर शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शाळेचं पूर्ण नावही आम्हाला उच्चारता येत नसत, होली स्पिरिट केवढं मोठं न अवघड नाव ते.मग त्याचा अर्थ “पवित्र आत्मा” असा होतो हे समजणं तर दूरच. त्यातून एक पळवाट शोधली ती म्हणजे कोणी शाळेचं नाव विचारलं की फक्त सांगायचं “अंजली शाळा”.या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळी शाळेच्या प्रांगणात होत असलेली सामुहिक प्रार्थना. सर्वप्रथम प्रार्थना नंतर प्रतिज्ञा, राष्ट्रगीत आणि देशपरभक्ती गीत असा क्रम असे.तद्नंतर दिनविशेष या पुस्तकाचे वाचन.त्यात सुविचार, दिनविशेष, व्यक्तिविशेष, बोधकथा, चिंतन आणि सर्वात शेवटी वर्तमानपत्र.या सर्व दिनक्रमात जवळपास एक ते दीड तास जात असत. तेंव्हा या गोष्टींचा फार कंटाळा यायचा मात्र त्या दिनक्रमामुळे आमच्यात नकळत मूल्यवर्धित शिक्षण संस्कार झाले.आज एवढ्या वर्षानंतरही तो क्रम लक्षात आहे यातच सर्वकाही आलं.

अंजली शाळा ही काही फक्त उंच इमारत, बंद भिंतीमधील शिक्षण पध्दती, पुस्तकी अभ्यास या संकल्पनापुरती कधीच मर्यादित नव्हती. कारण शिकणं फक्त पुस्तकात थोडंच असतं! ते जगण्यात असतं, अनुभवात असतं, अनुभवण्यात असतं. आम्हा सर्व विद्यार्थ्यांत असलेल्या कला कौशल्यला नेहमीच शाळेने प्रोत्साहन दिल. ही शाळा ख्रिश्‍चन समुदायामार्फत जरी चालवली जात असली तरी, तिथे धर्मावर आधारित संस्कार मात्र आमच्यावर कधीच झाले नाहीत. धर्मनिरपेक्षता हे मूल्य आमच्यामध्ये रुजविण्यात शाळेचा फार मोठा वाटा आहे असे मी ठामपणे सांगेन. वर्गात गेल्यावर समोरच्या काळ्या फळ्यावर लिहिलेला सुविचार वाचन करत डोळयातून अंतर्मनात जात नकळत भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा देत असत. नवीन वर्षात नवीन वर्गात जात असताना घातलेला नवीन गणवेश, नवीन पुस्तक व वह्या, त्या नाकाला लावून घेतलेला त्यांचा गंध, याची तुलना कोणाशीही करता येणार नाही.

सगळ्या गोष्टींची परिपूर्तता असूनही शाळा मात्र एका बाबतीत दुर्दैवी ठरली.शाळेला शासनाची मान्यता नव्हती. कित्येक वर्षे शाळेच्या व्यवस्थापनाने प्रयत्न करूनही तिच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी आम्ही पाचवीच्या वार्षिक परीक्षा देत होतो, शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने आमच्या सर्व पालकांची बैठक घेऊन मान्यतेअभावी शाळा बंद करावी लागेल अशी भूमिका मांडली. त्या वयात शासन मान्यता हा प्रकार आम्हाच्या बुद्धीच्या पलीकडचा होता मात्र एके दिवशी वर्तमान पत्रात लोकप्रिय शाळा बंद होणार अशी बातमी आली. आम्ही आमच्या शिक्षकांना तथा त्यावेळच्या मुख्याध्यापिका यांना विचारलंही, त्यावेळी मुख्याध्यापिका असलेल्या सिस्टरांनी मात्र आमच्या प्रश्‍नार्थक चेहऱ्याकडे बघत स्मित हास्य करत याच उत्तर देण्याचं टाळलं.

आज शाळा आमच्या काही कागदपत्रांपुरती उरली आहे. शाळा चालवणाऱ्या सर्व ख्रिश्‍चन समुदायाच्या कोणत्याही सिस्टर आज आमच्यासोबत संपर्कात नाही.कारण त्याकाळी संपर्क साधण्याची साधनेच उपलब्ध नव्हती. काही मित्र आज संपर्कात आहेत तेही फक्त समाजमाध्यमापुरतेच. आज आहेत त्या फक्त आठवणी. आजही शालेय स्तरीय गुणपत्रक, प्रमाणपत्रे पाहिली की मन आठवणींच्या हिंदोळ्यावर नकळत झुलत असत. सरतेशेवटी शाळा कागदोपत्री अथवा बाकी लोकांसाठी बंद झाली असेलही मात्र माझ्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात ती आजही आठवणी स्वरूपात कायम जिवंत आहे..!!

खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा. मला पुन्हा लहान व्हायचंय; हसायचंय-खेळायचंय, मला पुन्हा शाळेत जायचंय!!

– विवेकानंद नुरसिंग चव्हाण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)