आमदार गोरेंना हद्दपार करायचंय हे आधीच ठरलंय…!

शेखर गोरे यांचा दावा; सर्वपक्षीय नेत्यांनी हटाव मोहिमेत सहभागी होण्याची गरज

गोंदवले – माण मतदारसंघात 2014 पासून आम्ही जनतेच्या आशीर्वादाने आमदार जयकुमार गोरेंची गुंडगिरी व हुकूमशाही मोडीत काढली आहे. आमदारांना थांबवत त्यांना मतदारसंघातून हद्दपार करायचे, हे सामान्य जनतेच व आमचं आधीच ठरलंय. सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या जे मनात आहे ते आम्ही गेली सात वर्षे करतोय. आजपर्यंत ते कृतीतून दाखवूनही दिले आहे. आता सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र येऊन आमदार गोरे हटावचा नारा देत “आमचं ठरलंय,’ म्हणत आहेत. पण तुम्हा सर्वांच्या मनात खरच जर आमदार गोरेंना मतदारसंघातून हटवायचे असेल तर तुम्हीच सर्वजण या मोहिमेत सहभागी व्हावे, 111 टक्के आपली मोहीम यशस्वी होईल, असे आवाहन माण खटावचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी माण विधानसभा मतदारसंघातील नेतेमंडळींना केले आहे.

माण विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येऊन “आमचं ठरलंय,’ म्हणत आमदार गोरे हटाव मोहिमेचा नारा दिला आहे. या पाश्‍वर्वभूमीवर शेखर गोरे यांनी कुळकजाई येथे पत्रकार परिषद घेतली. गोरे म्हणाले, “”आमदार जयकुमार गोरेंची 2009 पासूनची गुंडगिरी व हुकूमशाही प्रवृत्ती सामान्य जनतेने पाहिली आहे. अनेकांना त्याच फटकाही बसला आहे. ज्यांनी त्यांना निवडणूकीत मदत केली, त्यांनाही या बहाद्दराने सोडले नाही. जाणीवपूर्वक बोगस तक्रारी करून त्यांच्यामागे ससेमिरा लावून अनेकांना त्रासच देण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला होता. मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीची दहशत, गुंडगिरी कमी करायची या हेतूने लक्ष देत प्रसंगी अंगावर केसेस घेत त्यांची गुंडगिरी मोडीत काढली. त्यांच्या जाचातून सामान्य जनतेला बाहेर काढण्याचे काम करून दाखवल्यानेच आज सर्वसामान्य जनता मोकळा श्‍वास घेत आहे.”

सर्वसामान्य जनतेचा विश्‍वासघात करत चुकीच्या मार्गाने राजकारण करणाऱ्या आमदारांसारख्या अपप्रवृत्तींना वेळीच थांबवणे गरजेचे होते. म्हणूनच आपण आमदार जयकुमार गोरे यांनाही मतदारसंघातून हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. त्यांना हद्दपार करण्याची आमची मोहीम गेली सात वर्षे चालू आहे. पाच वर्षात बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेत त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याचे काम केले आहे. ती मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात आली असून 75 टक्के काम आम्ही पूर्ण केले आहे. आता राहिलेय ते फक्त 25 टक्के काम. जर सर्वपक्षीय नेतेमंडळी याच मुद्‌द्‌यांवर एकत्र आलेत ते ही या मोहिमेत सहभागी झाले तर उर्वरित काम एकजूटीने पूर्ण करून वाईट अपप्रवृत्तींच्या आमदारांना मतदारसंघातून कायमचेच हद्दपार करूयात, असे आवाहनही
त्यांनी केले.

राजकारणात 2012 पासून सक्रिय झाल्यानंतर स्वकष्टातून कमावलेल्या पैशांतून काही हिस्सा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करायचा या हेतूने स्वखर्चातून कामे सुरू केली. तालुक्‍यातील अनेक संस्थांच्या आमदारांच्या वर्चस्वाला सुरूंग लावत सत्ता परिवर्तन घडवत आमदारांचे माण मतदारसंघात पानिपत केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माण मतदारसंघात स्वकर्तृत्वावर सामाजिक व राजकीय वाटचाल करताना ज्या पक्षांत असेन त्याचे निस्वार्थीपणे काम केले आहे. पक्षसंघटना मजबूत करत मतदारसंघातील बहुतांश सत्तास्थाने त्या पक्षाच्या झेंड्याखाली आणली. मात्र, तोच पक्ष आपल्याला दुय्यम वागणूक देत असल्याचे जाणवू लागल्याने नाराज होऊन आम्ही बाहेर पडलो. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्ष आपल्या संपर्कात असून शेवटच्या क्षणी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार हटाव मोहीम शेवटच्या टप्प्यात…!
सन 2014 पासून आपण माण मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पाच वर्षांत बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेत त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्याचे काम केले आहे. यातील 75 टक्के काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले आहे. या मोहिमेचा आता अंतिम टप्पा सुरू झाला असून आता राहिलेले 25 टक्के काम या विधानसभेला पूर्ण करून माण मतदारसंघात निश्‍चितच परिवर्तन घडवणार आहे.

वरिष्ठ पातळीवर आमचंही ठरलंय…
माण मतदारसंघात विधानसभा निवडणूक कोणाकडून लढवायची हे आमच वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी ठरलंय. येणाऱ्या काळात सर्वांना समजेलच. हे आताच बोलणं उचित ठरणार नाही. थोड्याच दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. प्रसंगी अपक्षही निवडणूक लढवण्याची आम्ही तयारी ठेवली आहे.

गोरे बंधू एकत्रच म्हणणाऱ्यांची कीव येते…
आमदार जयकुमार गोरे व मी जरी भाऊ असलो तरी आमचे मार्ग वेगळे आहेत. माझे व त्याचे नाते संपलेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकत्र येऊच शकत नाही. माझे नाते जनतेशी घट्ट आहे. जनता हीच माझी आई, वडील, भाऊ, बहिणी आहेत. काही जण गोरे बंधू एकच असल्याचे सांगत बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही.उलट मला तर असे वाटतेय की जे माझ्यावर असे आरोप करतेत त्यांचीच जयकुमारला निवडून आणण्याची मानसिकता दिसून येते. त्यांना जयकुमारला मतदारसंघातून हटवायचा नाही तर त्याचे बस्तान कायम बसवायचे आहे, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)