विधानसभेला दौंडमधून कॉंग्रेसचीही दावेदारी

यवत – आगामी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दौंड विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह पाचजण इच्छुक असतानाच कॉंग्रेस आय पक्षाकडे दौंडमधून कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे व विद्यमान तालुकाध्यक्ष अशोक फरगडे यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीसह कॉंग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.

2014मध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षामध्ये जागा वाटपामध्ये आघाडीत बिघाडी झाल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होऊ शकली नव्हती. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्तेपासून दूर राहिले होते. गेल्या विधानसभेप्रमाणे या विधानसभेला जर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली नाही तर दौंडमध्ये तिरंगी अशी रंगतदार लढत होईल. दौंडमध्ये रासपचे आमदार राहुल कुल व माजी आमदार, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे प्रत्येक गावात प्रबळ गट आहेत. राष्ट्रवादीकडून थोरात यांच्यासह तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, महेश भागवत, आनंद थोरात इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या वाढल्याने पवारांची डोकेदुखी वाढणार असून शरद पवार कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकी प्रमाणे कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी न झाल्यास कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले पोपटराव ताकवणे व अशोक फरगडे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल. त्यामुळे आगामी निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता आहे.

रमेश थोरात यांना पक्षातूनच प्रतिस्पर्धी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रमेश थोरात यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असतानाच पक्षातीलच चार जणांनी विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केल्याने पक्ष श्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. पक्षश्रेष्ठी कोणताही निर्णय घेवो; मात्र रमेश थोरात यांना पक्षातूनच प्रतिस्पर्धी आहेत.

राहुल कुल कोणत्या पक्षातूून लढणार?
आमदार राहुल कुल यांनी 2014ची निवडणूक ही राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेत लढवली होती. त्यावेळी कुल यांनी विजय मिळवित राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांचा जवळपास साडेअकरा हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी असून लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या उमेदवारीवर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना दौंडमधून 30 ते 40 हजारांचे मताधिक्‍य मिळणे अपेक्षित असताना फक्त 7 हजारांचे लीड मिळाले. धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजाचे मतदार कुल यांच्यापासून दूर गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक राहुल कुल यांच्यासाठी अडचणीची असणार आहे. राहुल कुल आगामी निवडणूक रासपकडून लढवतात की भाजपा कडून किंवा अपक्ष लढवतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)