22 गावांच्या पाणीप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

माजी खासदार मोहिते पाटील : सराफवाडीत छावणीला भेट

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील परिसरांमध्ये दुष्काळाची स्थिती भीषण असल्यामुळे तालुक्‍यात पुढील काही महिने चारा छावण्या सुरू राहिल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चारा छावण्यांची मुदत वाढवण्यासाठी व 22 गावांतील शेतकऱ्यांना हक्‍काचे पाणी शेतीला मिळण्यासाठी शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. आगामी काळात इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांनी दिली.

मौजे सराफवाडी (ता. इंदापूर) येथे इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चारा छावणीला सदिच्छा भेट व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी माजी खासदार मोहिते-पाटील यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अकलूज सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा, सराफवाडीचे सरपंच सुखदेव बाबर, बाळासाहेब काळे, अनिल साळुंखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते धनंजय पाटील, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष बापूराव माने, यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

मोहिते पाटील म्हणाले की, नीरा नदीच्या तीरावरील असणारी गावे हक्‍काच्या पाण्यावाचून वंचित आहेत. या गावातील शेतकऱ्यांनी सातत्याने माझ्याकडे शेतीला पाणी मिळावे, यासाठी मागणी केली आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या शेतीला व नागरिकांना पिण्यासाठी पाणी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा शासनस्तरावर विचार होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सराफवाडी परिसरामध्ये चारा, पाण्याची कमतरता असल्यामुळे चारा छावणीशिवाय पर्याय नाही. पशुपालकांना छावणीच्या माध्यमातून आधार मिळतो आहे. त्यामुळे पुढील काही कालावधीत छावण्या सुरू राहतील, असा प्रयत्न शासनाकडून करून घेतला जाईल.

किरण बोरा म्हणाले की, 22 गावांतील शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेकडो एकर शेती नापीक होऊ लागली आहे. मोहिते पाटील परिवाराचे आणि या 22 गावांतील नागरिकांचे ऋणानुबंध आहेत. या भागातील शेतकरी सातत्याने मोहिते पाटील घराण्याचे एकनिष्ठ आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांनी 22 गावांतील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. मागील 50 ते 60 वर्षांत भागावर अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. त्यामुळे या भागाला हक्‍काचे पाणी मिळाले पाहिजे, याचे नेतृत्व मोहिते-पाटील यांनी केले तरच पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, असाही आशावाद त्यांनी व्यक्‍त केला.

यावेळी बाजार समितीच्या वतीने माजी खासदार मोहिते-पाटील यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन किरण बोरा यांनी केले. बापूराव माने यांनी आभार मानले.

पशुपालकांबरोबर मोहितेंचा संवाद
सराफवाडी येथील चारा छावणीत माजी खासदार मोहिते-पाटील यांनी भेट देत असताना शेतकऱ्यांना व पशुपालकांना जनावरांना चारा मिळतो का, जनावरे किती दुध देतात आणखी चारा छावण्यांमध्ये काही देणे गरजेचे आहे. यासंदर्भात मोहिते – पाटील यांनी पशुपालकांबरोबर मनमोकळेपणाने चर्चा केली. कित्येक पशुपालकाने दादासाहेब फक्‍त पुढील काही महिने चारा छावण्या सुरू राहण्यासाठी प्रयत्न करा, असे साकडे घातले. यावर मोहिते – पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटू. परंतु चारा छावण्या सुरू ठेवू, अशी ग्वाही पशुपालकांना दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.