‘इंद्रायणी’ने गाठली धोक्‍याची पातळी

नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा : आळंदीतील सोपान पूल, पुंडलिक मंदिर पाण्याखाली

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाची संततधार सुरू आहे. तर मावळ परिसरतही मुसळधार पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीला पूर आला असून, आळंदीतील भक्‍ती सोपान पूल, पुंडलिक मंदिरही पाणीखाली गेले आहे. नदी दुथडी भरून वाहत असून धोक्‍याची पातळी गाठली असल्याने प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी पाहण्यासाठी व सेसेल्फी घेण्यासाठी नागरिकांची आळंदीत गर्दी होत आहे.

आळंदी परिसरात कधी मुसळधार तर कधी रिमझीम पाऊस सुरू असल्याने तीन दिवसांपासून सूर्य दर्शनच झाले नाहीत. तर अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मावळ परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढच होत असल्याने त्याचा परिणाम आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी काठावरील आळंदी, चिंबळी, निघोजे, मोई, कुरुळी, मोशी, डुडुळगाव, केळगाव, सोळू, चऱ्होली, धानोरे, गोलेगाव, मरकळ आदी गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीत खळखळ पाणी वाहत असल्याने पात्रातील जलपर्णी वाहून बंधाऱ्यात अडकत असल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. इंद्रायणी घाटावरील भक्‍त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले असून मंदिराचा अर्धा भाग वर दिसून येत आहे, तर अस्थी विसर्जन कुंडदेखील पाण्याखाली गेला आहे.

नदीकडेला किमान तीन महिने राहू नका
इंद्रायणी नदीला सतत पूर येत आहे तरी नदीच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांनी पावसाळा संपेपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी व नदीकडेला किमान तीन महिने तरी राहू नये अशा सूचना आळंदी नगरपरिषद, खेड तहसीलदार प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

अनेक भागांत नागरिकांच्या घरात शिरले पाणी

तीर्थक्षेत्र आळंदीत वरुणराजा धो-धो बरसत आहे. त्यातच दत्त मंदिर रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज लाईनचे पाणी ही बाहेर येत असून ते आता थेट नागरिकांच्या घरात शिरू लागल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. याबाबत दरवर्षी मालमताधारक नगरपालिकेला वेळोवेळी कळवितात तरी देखील पालिकेकडून कोणतीच कारवाई होत नाही, त्यामुळे भर पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी हे थेट नागरिकांच्या घरात शिरू लागल्याने दत्त मंदिर रस्त्यावरील जाधव कुटुंब अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. त्यांच्या घरातील महत्त्वाच्या वस्तू रस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे भिजु लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. त्याचबरोबर माऊली पार्क, संतोषी माता मंदिर परिसर, पद्मावती रस्ता वडगाव रस्ता, इंद्रायणी नगर, गोपाळपुरा आदी ठिकाणी चुकीच्या ड्रेनेज लाईनमुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी हे आता थेट नागरिकांच्या घरात शिरू लागले आहे. पालिकेने याकडे वेळीच लक्ष देऊन यात सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×