दहशतवाद आणि समाज

संग्रहित छायाचित्र...

मानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे? अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.

आजमितीला आपल्या देशातल्या 608 जिल्ह्यांपैकी 231 जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेल्या दहशतवादा मुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे. ज्या प्रमाणात अफाट शस्त्रास्त्रनिर्मिती आणि त्यांची जग भरात सुरू असलेली बेकायदा खरेदी-विक्री पाहता सारे जगच दहशतवादाच्या कचाट्यात सापडलेले आहे एवढे मात्र नक्की. मग त्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या अतिप्रगत देशांचाही आता अपवाद राहिलेला नाही हे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते. पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अनेक जणांनी अधोरेखित केली आहे.

दहशतवाद हा हिरवा आहे, की भगवा, की लाल याबाबत बरीच चर्चा चालते. परंतु जेव्हा परदेशात एकाच धर्मातील दोन पंथांतील व्यक्‍ती परस्परांची व पर्यायाने आपल्याच धर्माची स्थळे बॉम्ब टाकून उद्‌वस्त केल्याच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा एकच निष्कर्ष निघतो कि – दहशतवादाला कुठलीच जात व धर्म नसतो, त्याची ओळख निव्वळ अमानवी क्रूरता एवढीच उरते. याचे उदाहरण म्हणजे पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा हल्ला देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मनाला जातो यामध्ये आपल्या देशाचे 44 ते 50 जावं शहीद झाले.यामध्ये दहशतवाद्याने 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार जवानांच्या ताफ्यावर धडकवली होती. यानंतर श्रीलंकेमध्ये चर्चमध्ये झालेला आत्मघातकी हल्ला यामध्ये तब्बल 321 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, 500हून अधिक जण जखमी झाले आहेत, आणि नुकताच झालेला गडचिरोली नक्षलवादी हल्ला या हल्ल्यामध्ये राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शिघ्र कृती दलाचे 16 जवान शहीद झाले आहेत. आजच्या घडीला माणसाची हि क्रूरता कुठपर्यंत पोहोचली आहे हे या सर्व घडामोडीवरून सर्व जगाला कळत आहे तरीही सर्व शांत का? हा एक महत्वाचा प्रश्‍न येथे उपस्थित होतो, हे थांबेल का? याला आळा घालता येईल का? असे अनेक प्रश्‍न आज जगाच्या पाठीवर एकंदरीत सामान्य माणसाच्या डोक्‍यावर घिरट्या घालत आहेत.

देशाच्या सैन्याप्रमाणेच आधुनिक हत्यारांनी सज्ज असलेला दहशतवादी बाह्यगणवेशात एखाद्या सैनिकाप्रमाणे सजला तरी त्याची मानसिकता कधीच सैनिकाची असू शकत नाही. कुठल्याही देशाचा जवान आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची पर्वा न करता लढत असतो व प्रसंगी युद्धात हौतात्म्य स्वीकारत असतो. दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे. ह्यांची हीच कमकुवत मानसिकता समाजातील कमजोर दुव्यांचा शोध घेते आणि छोटी मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक ह्यांचे सहज सोपे टार्गेट ठरवले जाते. म्हणूनच कुठलाही दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला म्हणूनच अधोरेखित होतो कारण त्यात कसलेच शौर्य नसते। असते ती फक्त स्वत:च्या विकृत विचारसरणीच्या अस्ताची भीती.

– प्रा.भगवान केशव गावित

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)