शॉर्ट फिल्म कॉर्नर : जुई

या लघुपटाची सुरुवात एका ब्युटी पार्लरपासून होते. एक नवीन नवरी नटून तेथील ब्युटीशनला धन्यवाद म्हणून जाते. तेथील रिस्पेशनिस्ट जुई नावाच्या एका महिलेला आवाज देऊन तुमचा नंबर असल्याचे सांगते. जुई केस कापायला ब्युटी पार्लरमध्ये आलेली असते. जुईचे केस मोठे असल्याने त्या पार्लरमधील कर्मचारी केसांची स्तुती करते. जुई तिला म्हणते केस कापायचे आहेत. कर्मचारी कापायला सुरुवात करते. कंबरेपर्यंतचे केस कमी केल्यावर कर्मचारी तिला विचारते. ठीक आहेत का एवढे? परंतु, जुई म्हणते, अजून छोटे करा. हे ऐकून ती कर्मचारी पुन्हा केस कापण्यास सुरुवात करते. ती म्हणते, एवढे सुंदर केस का कापत आहेत. तुमच्यावर लेअर कट छान दिसेल.

कंबरेपासूनचे पाठीपर्यंत, नंतर खांद्यापर्यंत तिथेही न थांबता कानाएवढे केस कमी झाले तरीही जुई म्हणते अजून केस कापा. जेणेकरून माझ्या नवऱ्याच्या हातात केस येणार नाहीत. हे ऐकून पार्लरमधील बाकी स्त्रिया तिच्याकडे पाहू लागतात. आणि जुईच्या डोळ्यातून अश्रू तरंगतात.

21व्या शतकातही अनेक महिलांसोबत घरगुती हिंसाचार होतो. कोणाचा हुंड्यासाठी तर कोणाचा मुलगाच हवा या अट्टहासासाठी. आज घरगुती हिंसाचारापासून संरक्षणासाठी अनेक कायदे सरकारने बनवले आहेत. परंतु, महिला हा हिंसाचार शांतपणे सहन करतात. घरगुती हिंसाचार काही सर्वसामान्य स्त्रियांनाच सहन करावा लागतो असे काही नाही. सेलेब्रिटींही घरगुती हिंसाचाराला बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाय भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात घरगुती हिंसाचाराला महिला बळी पडत आहेत. अमेरिकेसारखा विकसित देशही या गोष्टीला अपवाद नाही. माझे असे म्हणणे नाही की केवळ महिलाच अत्याचाराला बळी पडतात. काही पुरुषांवरही घरगुती अत्याचार होतात. अनेक वेळेस महिलाच महिलांवर अत्याचार केलेली उदाहरणे जास्त आहेत. त्यामुळे स्त्रियांनीही आता अत्याचाराविरोधात आवाज उठविला पाहिजे. अत्याचार करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अत्याचार सहन करणाराही दोषी असतो. केवळ आपला संसार टिकावा म्हणून अनेक स्त्रिया अत्याचार निमूटपणे सहन करतात. परंतु, हा काही उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अन्यायाला विरोध करा. आपल्यावरच नाही तर दुसरीवरही अन्याय होत असेल तर तो थांबविण्याची हिम्मत आणि ताकद आपल्यात असली पाहिजे. तरच आणि तरच आपल्याला माणूस म्हणवून घेण्याचा हक्क आहे.

– श्‍वेता शिगवण

Leave A Reply

Your email address will not be published.