जीवनविमा घ्या संयुक्तपणे (भाग-१)

सध्याच्या धावपळीच्या युगात अनिश्‍चितता वाढल्याने जीवन विमा योजनेला मागणी वाढत चालली आहे. विमा कंपन्या देखील बदलत्या काळानुसार योजनेत बदल करत आहेत. गरजेनुसार वैशिष्ट्यपूर्ण विमा योजना आणून ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याबाबत तत्पर असल्याचे दिसून येत आहेत. याशिवाय नागरिकांची गरज लक्षात घेता विमा कंपन्या संयुक्त जीवन विमा योजना आणत आहेत. यानुसार जोडपे असो किंवा व्यापारातील भागीदार असो एकाच विमा योजनेंतर्गत आर्थिक सुरक्षा प्रदान केली जात आहे. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे दोन-दोन जीवन विमाच्या खर्चाच्या तुलनेत एका विम्याचा खर्च हा कमी आहे. त्याचबरोबर त्याचे व्यवस्थापन करणेही सोपे आहे. यानुसार संयुक्त विमा योजनेचे लाभ इथे सांगता येतील.

संयुक्त विमा योजनेचा हप्ता हा साधारणपणे एका लाखासाठी वार्षिक 700 रुपये ते हजार रुपयांपर्यंत असतो. 80 सी आणि 10 (10डी) नुसार विमाधारकाला करसवलत मिळते.

वैवाहिक जोडप्यांसाठी चांगला पर्याय :
संयुक्त जीवन विमा पॉलिसी या नावातूनच कळते की ही पॉलिसी दोघांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ही पॉलिसी वैवाहिक जोडप्यांसाठी चांगला पर्याय मानला जातो. यानुसार पती किंवा पत्नी यापैकी एक जण नसल्यास दुसऱ्याला विम्याची रक्कम दिली जाते. अर्थात बहुतांश पॉलिसीत सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसी संपते.

संयुक्त जीवन विम्याचे प्रकार
विमा कंपन्या संयुक्त विम्यानुसार दोन प्रकारच्या योजना उपलब्ध करून देतात. पहिला संयुक्त टर्म प्लॅन आणि दुसरा म्हणजे एंडोमेंट प्लॅन.

संयुक्त टर्म प्लॅन
या प्रकारच्या टर्म प्लॅनमध्ये एक हप्त्यात दोन व्यक्तींसाठी निश्‍चित कालावधीसाठी विमा कवच दिला जातो. दोन व्यक्तींत पती-पत्नीत किंवा दोन व्यावसायिक भागीदार देखील असू शकतात. विम्याचा कालावधी हा 10 ते 30 वर्षांपर्यंतचा असू शकतो. विम्याचा हप्ता हा साधारणपणे वयानुसार आणि दोघांची आरोग्य स्थिती पाहून निश्‍चित केला जातो. कमी वयात पॉलिसी घेणे हिताचे ठरते. कारण विमा कंपन्या हप्ता कमी आकारतात.

संयुक्त एंडोमेंट पॉलिसी
एंडोमेंट प्लॅन हा जीवन सुरक्षेबरोबरच गुंतवणुकीचा देखील पर्याय देतात. या विमा योजनेत दोन व्यक्ती किंवा वैवाहिक जोडप्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते. संयुक्त टर्म प्लॅनप्रमाणेच यातही एका निश्‍चित कालावधीपर्यंत विमा कवच दिले जाते. बहुतांश कंपन्या निवृत्तीवयांपर्यंत विमा कवच देतात. निवृत्तीनंतर विमाधारकाला एक निश्‍चित रक्कम मिळते, त्यास एंडोमेंट असे म्हटले जाते. पीएनबी मेटलाइफ, एगॉन रेलिगेअर आणि एसबीआय लाइफने संयुक्त विमा सुरू केला आहे.

जीवनविमा घ्या संयुक्तपणे (भाग-२)

विमा व्यवस्थापन सोपे
संयुक्त टर्म प्लॅनचा प्राथमिक लाभ हा योजनेत असलेल्या सुविधेचा आहे. दोन वेगवेगळ्या विमा याजेना घेण्यापेक्षा एकच विमा योजना घेणे हिताचे आहे आणि त्याचबरोबर त्याचे व्यवस्थापन करणेही सोपे जाते. जर वैवाहिक जोडपे नोकरदार असेल तर त्याच्यासाठी उपयुक्त पर्याय आहे. कारण आजच्या काळात आर्थिक जबाबदारी ही पती आणि पत्नी सारखीच असते. गृह कर्जापासून मोटार कर्ज देखील दोघांच्या नावावर असते. अशा स्थितीत सामायिक आर्थिक सुरक्षा दोघांनाही गरजेची आहे. संयुक्त विमा हा एक चांगला पर्याय आहे.

– स्वरदा वैद्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)