नवी दिल्ली – दैनंदिन जीवनातील अनेक नियमांमध्ये येत्या 1 एप्रिलपासून बदल होणार आहे. यातच एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू होत असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यावेळी एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहनांच्या किंमतीतही वाढ होणार आहे.
LPG-CNG च्या किंमती वाढण्याची शक्यता
दर महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार 1 एप्रिल पासून एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या नव्या किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
सोन्याबाबत नवीन नियम
31 मार्च 2023 पासून 4 अंकाच्या हॉलमार्क युनिक आयडेंटीफिकेशन असणाऱ्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. आता 1 एप्रिल 2023 पासून 6 डिजिटवाले हॉलमार्क HUID दागिने विक्री करता येतील.
वाहनांच्या किंमतीत वाढ
1 एप्रिल पासून वाहनांच्या किंमती वाढ होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, होंडा या कंपन्यांच्या गाड्या महागणार आहे. यापूर्वीच या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली होती.
जास्त वार्षिक हप्ता असलेल्या विमा पॉलिसींवर कर
1 एप्रिलपासून 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक हप्ता असलेल्या विमा पॉलिसींद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार आहे. उच्च हप्त्यांसह विम्याच्या उत्पन्नावर 2023 च्या अर्थसंकल्पात कर जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हे बदल होणार आहेत.