‘बर्ड फीडर’ ठरताहेत पक्ष्यांसाठी संजीवनी

अन्न, पाणी मिळत असल्याने पक्ष्यांची भरतेय शाळा

पुणे – रणरणत्या उन्हात अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या पक्ष्यांना मोठा त्रास होतो. तो कमी करण्यासाठी पक्षीप्रेमी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र, त्यामुळे पक्ष्यांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याची काळजीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच यंदा पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांपासून बनवलेल्या तसेच नैसर्गिक भासणाऱ्या “बर्ड फीडर’चा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जात आहे.

उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना अन्न-पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात होते. शेतीची कामे झाली असल्याने अन्न मिळत नाही. अशावेळी अन्न-पाण्याच्या शोधात पक्षी दूरवर भ्रमंती करतात. अशावेळी “बर्ड फीडर’ हा पक्ष्यांसाठी चांगला पर्याय ठरतो. कमी जागेत, अत्यंत कमी संसाधनांचा वापर करून बनविणारे “बर्ड फीडर’ हे पक्ष्यांसाठी संजीवनी ठरत आहे. मातीपासून तयार केलेल्या “बर्ड फीडर’मुळे पक्ष्यांना नैसर्गिक आधिवासाची अनुभुती मिळते. असे “बर्ड फीडर’ पक्ष्यांच्या आरोग्यासाठीदेखील चांगले असल्याने अशा “बर्ड फीडर’चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पक्षी अभ्यासक करत आहेत.

शरात मैना, मुनिया, कबूतर, चिमणी आणि पोपट यांसारखे पक्षी आढळतात. अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या या पक्ष्यांसाठी मातीचे बर्ड फीडर हे अत्यंत उपयुक्त ठरतात. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ असे मिश्र स्वरूपाचे धान्य ठेवळे तसेच शेजारीच मोठ्या आकाराचे वॉटर बाऊल्स म्हणजेच पाण्याचे पात्र ठेवल्यास त्याचा पक्ष्यांना चांगला उपयोग होतो. पक्षी संवर्धनात यामुळे मोठा हातभार लागतो.’
– सत्यजीत नाईक, पक्षी अभ्यासक.

बर्ड फीडर हा एक उपयुक्त पर्याय असला, तरी तो सर्वच प्रकारच्या पक्ष्यांना उपयुक्त ठरत नाही. शहरात सुमारे 30 प्रकारचे पक्षी आढळतात. मात्र, ते सर्वच धान्य खातात असे नसते. काही पक्षी हे कृमी, कीटक यांच्यावर जगतात. त्यामुळेच सोसायट्यांच्या प्रांगणात, टेरेसवर अथवा बाल्कनीमध्ये बागा फुलविल्यास त्या पक्ष्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतील. यामुळे पक्ष्यांना अन्न उपलब्ध होण्याबरोबरच नैसर्गिक अधिवासही उपलब्ध होण्यास मदत मिळेल.

सहा वर्षांनंतर चिमणीचे दर्शन
सत्यजीत नाईक हे गेली सहा वर्षे त्यांच्या घराच्या आवारात पक्ष्यांसाठी बर्ड फीडरचा वापर करत होते. मात्र याठिकाणी कबुतर, पोपट, मैना असे विविध पक्षी येत, परंतु चिमणी हा पक्षी एकदाही दिसला नाही. परंतु नाईक यांनी मातीच्या बर्ड फीडरचा वापर करत मिश्र धान्य आणि वॉटर बाऊल आवारात ठेवले. यामुळे चिमणी हा पक्षी त्यांच्या आवारात दिसू लागला आहे. गेले आठवडाभर सुमारे आठ ते दहा चिमण्या दररोज त्याठिकाणी येऊन दिवसभर पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)