पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशाची दुसरी फेरी 15 जूनपर्यंत सुरू करण्याच्या हालचाली प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत.
“आरटीई’ प्रवेशासाठी 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 793 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. यासाठी 2 लाख 44 हजार 90 अर्ज दाखल झाले आहेत. 8 एप्रिल रोजी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी लॉटरी काढण्यात आली. यातून एकूण 67 हजार 716 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यातील 47 हजार 35 विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत प्रवेश झाले आहेत. उर्वरित 20 हजार 681 प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना पालकांकडून गुगल लोकेशनसह अन्य काही माहितीत खूप चुका झाल्या होत्या. या चुकांमुळे बहुसंख्य पालकांच्या मुलांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही. या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ मंगळवारी संपली आहे.