हॅले टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची आगेकूच

File photo

हॅले (जर्मनी) – विम्बल्डनच्या विजेतेपदाचा दावेदार असलेल्या रॉजर फेडरर याने हॅले टेनिस स्पर्धेती उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याने तुल्यबळ प्रतिस्पर्धी जो विल्फ्रेड त्सोंगा याच्यावर 7-6 (7-5), 4-6. 7-5 असा विजय नोंदविला. विम्बल्डनपूर्वीची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेस महत्त्व आहे.

फेडरर याला दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस व प्लेसिंगवर नियंत्रण ठेवता आले नाही. हा सेट घेत त्सोंगा याने सामन्यातील उत्कंठा वाढविली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये फेडरर याने बिनतोड सर्व्हिस व अचूक प्लेसिंग असा चतुरस्त्र खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्याला पुढच्या फेरीत स्पॅनिश खेळाडू रॉबर्टो बॅटिस्टा ऍग्युट याच्याशी लढत द्यावी लागणार आहे. फेडरर याच्या तुलनेत ऍग्युट याने एकतर्फी विजय मिळविला. त्याने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केट याचा 6-1, 6-4 असा सरळ दोन सेट्‌समध्ये पराभव केला. त्याने दोन्ही सेट्‌समध्ये पासिंग शॉटसचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने खोलवर सर्व्हिस व अचूक प्लेसिंगचा सुरेख खेळ केला.

स्थानिक खेळाडू ऍलेक्‍झांडर जेव्हेरेव्ह यानेही उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. त्याने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन याचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले. त्याने जमिनीलगत परतीचे फटके व वेगवान सर्व्हिस असा सुरेख खेळ केला. इटलीच्या मॅटिओ बेरेटिनी याने आंद्रेस सिप्पी याची विजयी मालिका 4-6, 6-3, 6-2 अशी संपविली. पहिला सेट गमाविल्यानंतर त्याने परतीचे खणखणीत फटके व व्हॉलीजचा उपयोग करीत उर्वरीत दोन्ही सेट्‌स घेतले. त्याने नुकत्याच स्टुटगार्ट येथील स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here