रॅगिंगविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी: गिरीश महाजन

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणातील दोषींवर होणार कारवाई

मुंबई – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय रूग्णालयात (नायर) स्त्रीरोग तज्ञ व प्रसुतीशास्त्र या पदव्युत्तर शिक्षणाचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करणार तसेच प्रत्येक महाविद्यालयात रॅगींग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार महिनाभरात प्रभावशाली अंमलबजावणीसाठी शिफारशी करण्यात येतील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, अमित देशमुख, अमिन पटेल, विजय वडेट्टीवार, प्रा.वर्षा गायकवाड, निर्मला गावीत, सुनील प्रभू, संजय केळकर, शशिकांत शिंदे यांनी डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणाबाबात कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना महाजन यांनी दोषीवर कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनीही कारवाई संदर्भातील तपशील सादर केला.

महाजन म्हणाले, डॉ. तडवी यांनी रॅगींग संदर्भात जी तक्रार केली होती. ती मागे घेण्यासाठी रूग्णालय अथवा महाविद्यालयातून कोणताही दबाव आणण्यात आला नव्हता. तसेच त्यांच्या शरीरावरील जखमा या पोस्ट मॉर्टमनंतरच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

डॉ. पायल तडवी यांना आदिवासी असल्या कारणावरून मानसिक त्रास आणि अपमानजनक वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ डॉक्‍टर भक्ती मेहेर, डॉ. हेमा अहुजा व डॉ. अंकिता खंडेवाल यांना अटक करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत वाढ करून भायखळा कारागृहात चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच युनीट प्रमुखाला निलंबित करण्यात आले असून, विभागप्रमुखाची बदली करण्यात आली असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

नायर रूग्णालयातच नाही, तर राज्यातील सर्वच महाविद्यालयात रॅगींग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात तसेच संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांच्या समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे, असे महाजन यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)