सोनिया गांधी यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी यांनी आज लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. रायबरेली येथून निवडणूकीत विजयी झालेल्या सोनिया गांधी यांनी कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी हिंदीतून शपथ घेतली. राहुल गांधी यांनी विरोधकांच्या बाकांवरून या शपथविधीचे मोबाईलवर फोटोही काढले.

सोनिया गांधी सदस्यत्वाची शपथ घेत असताना कॉंग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. तर सोनिया गांधी यांनी हिंदीतून शपथ घेतल्याने भाजपच्या सदस्यांनीही यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणा दिल्याचे ऐकू येत होते. सोनिया गांधी यांच्या पाठोपाठ भाजपच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही शपथ घेतली. सोनिया आणि मनेका दोघी जावा-जावांनी एकमेकींना हात जोडून अभिवादनही केले.

मनेका गांधी उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर येथून निवडणूक जिंकल्या आहेत. तर पिलभीत येथून विजयी झालेले त्यांचे पुत्र वरुण गांधी यांनीही आज शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी राज्यांचा क्रम वर्णमालेतील क्रमानुसार लावण्यात आला असतो. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.