वडगावशेरी “एचसीएमटीआर’ कृती समितीचा इशारा
पुणे – महापालिकेकडून शहरात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या उच्च क्षमता वर्तुळाकार वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याच्या कामासाठी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेकडून वडगावशेरी भागात मोजणी सुरू करण्यात आली आहे. या मोजणीस या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला असून महापालिकेने नागरिकांची बाजू ऐकून न घेता हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा वडगाव शेरी “एचसीएमटीआर’ कृती समितीच्या वतीने नगरसेवक महेंद्र पठारे, नारायण गलांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. तसेच, याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार केल्यास अधिकाऱ्यांकडून अरेरावी केली जात असल्याचेही यावेळी गलांडे यांनी सांगितले.
महापालिकेकडून सुमारे 36 किलोमीटर लांबीचा हा रस्ता करण्यात येणार आहे. वडगावशेरीतील फिनिक्स मॉलच्या बाजूने स.नं 9 व 5, तसेच 5,10,11,21,38,37 व 22 मधून हा मार्ग जात आहेत. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी महापालिकेने बांधकामांना परवानागी दिलेली आहे. तसेच, या मार्गाचे असलेले नकाशे डीपी प्रमाणे नाहीत. त्यानंतरही 15 मे रोजी या रस्त्याच्या मोजणीच्या कामासाठी गेलेल्यांना या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे 11 जून रोजी पुन्हा या भागात मोजणी सुरू असताना नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत त्यास विरोध केला. त्यामुळे या नागरिकांना बुधवारी महापालिकेत चर्चेसाठी बोलविण्यात आले होते.
मात्र, त्यावेळी प्रशासन तसेच नागरिकांमध्ये वादावादी झाल्याने महापालिकेकडून बंदोबस्तात मोजणी करण्याचे सुतोवाच करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून डीपीत प्रस्तावित असलेला रस्ता सोडून इतर जागेवरच याची आखणी असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून या रस्त्याविरोध केला जाणार असून न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे नगरसेवक पठारे आणि गलांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.