बारामती – बारामती उपविभागातील मोकाची सलग नववी कारवाई करीत खंडणी उकळणाऱ्या बॅड उर्फ संतोष दत्तात्रय अडागळे गॅंगला तालुका पोलिसांनी मोका लावला आहे. बारामती विभागात आजपर्यंत पोलिसांनी तब्बल 76 जणांवर मोक्काची कारवाई केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील यांनी याबाबत सांगितले की, संतोष अडागळे व त्याच्या साथीदारांविरोधात बारामती पोलीसांत खंडणीसह धमकी देणे, रोख रक्कम चोरणे असे गुन्हे दाखल आहेत. अडागळे याच्यासह विशाल अप्पा मांढरे व गणेश सत्यवान लांडगे (तिघे, रा. तांदूळवाडी) यांच्या विरोधातही पोलीस अधीक्षकांनी मोक्काचा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यांनी त्याला नुकतीच मंजुरी दिली. याप्रकरणी शिरगावकर यांनी सांगितले की, ज्या व्यापाऱ्यांना या टोळीने लुटले होते, ते फिर्याद देण्यासही घाबरत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना दिलासा दिल्यानंतर तक्रारी दाखल झाल्या. दरम्यान, कोणालाही अशा प्रकारे धमक्या येत असल्यास अथवा धमकावून लूट सुरू असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांत फिर्याद दाखल करावी, असे आवाहनही शिरगावकर यांनी केले आहे. दरम्यान, या कारवाईतनंतर धन्यकुमार गोडसे व त्याच्या टीमला पोलीस अधीक्षकांनी 15 हजारांचे बक्षीस दिले आहे.
पोलिसांच्या लिस्टवर आणखी 48 जण…
बारामती व इंदापूर तालुक्यात विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करणे, फेसबुक, व्हॉट्सऍपवर ग्रुप तयार करून त्यावर बंदुका, तलवारी हातात घेऊन फोटो आणि व्हिडिओ टाकणे, तलवारीने केक कापणे, अशा विविध प्रकारच्या माध्यमातून दहशत माजविणाऱ्या आठ टोळ्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून त्यातील 48 जण पोलिसांच्या लिस्टवर आले आहेत, त्यांच्यावरही लवकरच मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी सांगितले.