माऊलींच्या सोहळ्यात पोलीस वारकरी वेशात

सोहळ्याचे आज आगमन; वारीच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस दल सज्ज

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही

वारीचा सोहळा हा वारकऱ्यांसाठी पर्वणीचा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा शांतपणे पार पाडण्यासाठी व वारी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे काम करत आहे. विविध पथकांच्या माध्यमातून वारीच्या मार्गावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

सातारा – अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला पांडुरंग भक्तांची परीक्षा घेण्यासाठी जसा विविध रुपे घ्यायचा, अगदी तसेच वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी यंदाही सातारा पोलीस खास करून स्थानिक गुन्हे शाखा वारकऱ्यांच्या वेशात पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.

ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 2 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत सातारा पोलीस दलातील हजारो कर्मचारी त्यावर लक्ष ठेवून असतील. ज्ञानेश्‍वर महाराज पालखी लोणंद ते सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जाईपर्यंत सातारा पोलीस दलातील अधिकारी व पोलीस तैनात राहणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

वारी मार्गावर ठिकठिकाणी दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. पालखी सोहळ्यातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी “वॉच टॉवर’चा आधार घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी ठिकठिकाणी दहशतवादविरोधी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पालखीत हजारो वारकरी आणि नागरिक सहभागी होतात. त्यामुळे सोहळ्यावर “सीसीटीव्ही’ची नजर राहणार आहे. वारी मार्गावरील खासगी सीसीटीव्हीचीही पोलीस मदत घेणार आहेत. वारी मार्गावर सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल आणि मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)