वाहतुकीला अडथळा : उद्यान, अग्निशमन अनभिज्ञ
पिंपरी – नेहरूनगर येथील संतोषी माता चौकाजवळील एका वाळलेल्या झाडाजवळ कचरा पेटविल्याने हे झाड रस्त्यावरच पडल्याची घटना घडली. रस्त्यालगत असलेल्या या झाडाला आग लागल्यानंतर ते पदपथाबरोबरच रस्त्याच्या मध्यापर्यंत पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सायंकाळपर्यंत महापालिका उद्यान प्रशासन अथवा अग्निामन दलाला या प्रकाराची माहिती नव्हती, हे विशेष. सायंकाळी उशिरापर्यंत झाडाच्या बुंध्यातून धूर येत होता आणि निष्पर्ण झाडाच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध पडल्या होत्या.
नेहरुनगर-पिंपरी रस्त्यावर एचए कंपनीच्या मालकीच्या जागेत महापालिकेच्या उद्यान विभागाने झाडे लावली आहेत. त्यापैकी बहुतांशी झाडे बहावा आणि गुलमोहर या देशी प्रजातीची आहेत. उन्हाळ्यात या दोन्ही प्रजातीच्या झाडांना बहर येत असल्याने रणरणत्या उन्हात ही झाडे नागरिकांच्या डोळ्यांना थंडावा देतात.
एचए कंपनीच्या आवारात रस्त्यालगत असलेल्या एका झाडालगत काही अज्ञातांनी कचरा पेटविला होता. ट्री गार्ड असताना देखील बुंध्याजवळ आग लागल्याने हे झाड नेहरुनगर-पिंपरी रस्त्यावर पडले. हे झाड रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची संबंधित एकाही विभागाला माहिती नव्हती.