राष्ट्रवादीची बैठक : निर्णय अद्यापही गुलदस्त्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राजीनामा दिल्यानंतर आठवडाभराचा कालावधी संपुष्टात आला असला तरी अद्याप नवा विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीकडून निवडण्यात आलेला नाही. येत्या गुरुवारी (दि. 18) अजित पवार शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेणार असून यामध्येच नव्या विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर केले जाणार आहे.
2017 साली सत्तेतून पायउतार झालेल्या राष्ट्रवादीकडे पालिकेतील विरोधी पक्षेनेता हे एकमेव महत्त्वाचे पद आहे. या पदावर पक्षातील विविध नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने एक वर्षासाठी प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पहिल्या वर्षी योगेश बहल यांना संधी दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी दत्ता साने यांना संधी देण्यात आली होती. 17 जून रोजी त्यांचा कालावधी संपुष्टात आला होता. मात्र आपणाला आणखी दोन महिने या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी साने यांनी केली होती.
मात्र, इतरांनाही संधी मिळाली पाहिजे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साने यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार साने यांनी 9 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिला होता. यानंतर नवा विरोधी पक्षनेता कोण? यावर शहरात चर्चा रंगली होती. ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, जावेद शेख व माजी महापौर वैशाली घोडेकर यांच्यामध्ये स्पर्धा रंगली होती. यातून घोडेकर यांचे नाव मागे पडले असून काटे की शेख याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या गुरुवारी (दि. 18) अजित पवार हे शहराच्या दौऱ्यावर असून यावेळी पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्येच नवा विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे.
राजकीय भाष्याकडे लक्ष
एप्रिल महिन्यात लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अजित पवार शनिवारी (दि.13) शहरात खासगी कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी भाजपाविरोधी अथवा राजकीय भाष्य करणे टाळले होते. येत्या गुरुवारी ते पक्षाच्या बैठकीला येणार यावेळी ते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणते राजकीय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.