‘ईव्हीएम’ऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा – पार्थ पवार

कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी मावळ तालुक्‍याचा दौरा

तळेगाव दाभाडे – ईव्हीएमबाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी येथे केले.

लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा शोध आणि बोध घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी आज तालुक्‍याचा दौरा केला. यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित बैठकीत ते बोलत होते. तळेगाव स्टेशन येथील रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, कैलास गायकवाड, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आशिष खांडगे, तळेगाव शहर महिलाध्यक्षा सुनिता काळोखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पार्थ पवार पुढे म्हणाले की, मी पराभवाने खचून गेलो नाही. लोकसभेसाठी चांगले काम केलेल्या कार्यकर्त्यांनीही आता धीर धरावा. पुलवामा प्रकरण आणि पवार कुटुंबियांविषयी अफवांची बीजे भाजपा आणि आरएसएसने पेरली. आपण खरेच कमी पडलो का आणि त्यासाठी काय बदल करायचे यासाठी संवादाची गरज आहे. विधानसभेसाठी पुन्हा जोमाने काम करण्याचे आवाहन पार्थ पवार यांनी केले.

बबनराव भेगडे म्हणाले की, कोणी मंत्री झाला म्हणून विजयी होईल हा समज मनातून काढून टाका. सर्वजाती धर्माच्या कार्यकर्त्यांचे आणि महिलांचे संघटन आणि मतदारांशी संपर्कावर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

गणेश काकडे म्हणाले की, विस्कटलेले पक्षसंघटन लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे एकत्रित झाले. आता परिस्थिती सुधारत आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतीम मानून नगरपरिषदेची निवडणूक लढवली. प्रभागात चांगले काम आणि संपर्क असतानाही पराभवास सामोरे जावे लागले. नगरपरिषदेच्या निवडणुकांत ज्येष्ठ नेत्यांच्या तत्कालीन भूमिकेवर काकडे यांनी कोरडे ओढत रोखठोक मत मांडले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराचे निष्ठावंत म्हणून काम करण्याचा आणि निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंन्द्र किल्लावाला, तुषार भेगडे, राजेश बारणे, नगरसेवक अरूण माने, बापू कदम आणि निरंजन जहागीरदार या बूथ कमिटी प्रमुखांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पार्थ पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.