पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सदस्यांचा नुकताच कालावधी संपुष्टात आला असून येत्या 20 मे रोजी सर्वच विषय समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विषय समित्यांवर शिवसेनेला सोबत घेवून भाजपा युतीचा धर्म पाळणार की पुन्हा विषय समित्यावरही शिवसेनेला ठेंगा दाखविला जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. या पक्षाचे 77 नगरसेवक आणि पाच अपक्षांचा या पक्षाला पाठींबा असल्याने पालिकेत तब्बल 82 सदस्यांचे पाठबळ या पक्षासोबत आहे. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती संपुष्टात आली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते.
मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती अस्तित्त्वात आल्यामुळे महापालिकेतही युती होणार का? असा प्रश्न चर्चिला जात होता. मात्र स्थायी समितीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला साथ दिली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पालिकेत युतीची सत्ता राहील आणि भाजपा शिवसेनेला सोबत घेईल, अशी घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वर-वरचे का होईना एकत्र असल्याचे भासविले होते.
मात्र, निवडणुकीसाठी मतदान होताच प्रभाग समितीच्या निवडीमध्ये भाजपाने शिवसेनेनेला कोठेच संधी न देता ठेंगा दाखविला होता. युतीवरून बराच गदारोळ झाल्यानंतर भाजपाने आठवडाभरात कोणतेच वक्तव्य न केल्यामुळे विषय समित्यांवर शिवसेनेला संधी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा या चार समित्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने या समित्या सध्या बरखास्त झाल्या आहेत. 20 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या समितीच्या सदस्यांसह शिक्षण मंडळाच्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेला भाजपाकडून संधी दिली जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.