लाहोर – इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे 10 दिवस शिल्लक असताना पाकिस्तानच्या संघाने आपल्या प्राथमिक संघात महत्वाचे बदल केले असून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ यांना संधी दिली आहे. यासह असिफ अली यालाही संघात स्थान देण्यात आले असून जुनेद खान, फहीम अश्रफ आणि अबिद अली यांना संघाबाहेर करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक संघाला आधी जाहीर केलेल्या संघात कोणतीही परवानगी न घेता 23 मे पर्यंत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने आपल्या अंतिम संघात ऐनवेळी तीन बदल केले आहेत.
पाकिस्तनाच्या प्राथमिक संघाची घोषणा आधी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळला. या मालिकेत पाकिस्तानने अत्यंत खराब कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजांना सरासरी 300 हून अधिक धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे मालिका गमावल्यानंतर पाकिस्तनाच्या संघाने 20 मे रोजी संघात 3 महत्वाचे बदल करत त्यात 2 अनुभवी वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन घडवून आणले आहे.