कार्ड हॅक झाल्यास…

डिजिटल व्यवहार जितके सुलभ आणि जलदगतीने होतात, तेवढ्याच प्रमाणात ते संवेदनशीलही मानले जातात. एटीएम, नेटबॅंकिंग, मोबाइल बॅंकिंगच्या माध्यमातून बॅंकेचे व्यवहार तातडीने होतात. मात्र, हे व्यवहार काळजीपूर्वक करणेही तितकेच आवश्‍यक आहे. कारण आजकाल क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक करण्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अविश्‍वसनीय (अनऍथोराइज्ड) संकेतस्थळावरून व्यवहार केल्यास कार्ड हॅक होण्याचे प्रमाण बळावते. या काळात आपली गोपनीय माहिती लीक होते. त्याचबरोबर मेल्स आणि ऍप्समधून मालिशियस सॉफ्टवेअर डाऊनलोड होण्याच्या स्थितीत आपल्या मोबाइलच्या फोन मेमरीतून डेटा लीक होण्याची शक्‍यता वाढते. शेवटी हॅकर्स या माहितीच्या आधारे कार्ड हॅक करतात आणि चोरलेल्या कार्डवर उधळपट्टी करतात. यासंदर्भातील बातम्याही आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील.

सुरक्षित व्यवहारासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी आणि याबाबत बॅंकेकडून वारंवार सूचनाही येत असतात. मात्र, काहीवेळा एखादा ग्राहक फसवणुकीला बळी पडतो. दुर्दैवाने कार्ड हॅक झाले तर काय करावे, हे समजत नाही. परिणामी तो गोंधळून जातो. कार्डमधून पैसे गेल्याने तो अगोदरच धास्तावलेला असतो. म्हणूनच कार्ड हॅक झाल्याचे समजताच पुढील चार कृती तातडीने कराव्यात.

बॅंकेला कळवा :
जेव्हा आपले कार्ड हॅक होते किंवा आपल्या बॅंक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये किंवा कार्डच्या स्टेंटमेंटमध्ये एखादा अनाधिकृत व्यवहार आढळून आला असेल तर आपण तातडीने यासंदर्भातील माहिती बॅंकेला कळवायला हवी. सर्व बॅंकांची किंवा कार्ड कंपन्यांची कस्टमर केअर हेल्पलाइन नंबर चोवीस तास सुरू असते. हा क्रमांक कार्डच्या मागे असतो. जर कार्ड सापडत नसेल तर संकेतस्थळावरून देखील हेल्पलाइनची माहिती मिळते. आपण जेवढ्या वेगाने बॅंकेला फसवणुकीची माहिती द्याल, तेवढ्या प्रमाणात आपली आर्थिक फसवणूक कमी राहील. बहुतांश कार्ड कंपन्या कार्डच्या चुकीच्या व्यवहाराची माहिती देण्यासंदर्भात ग्राहकांना आयव्हीआर, फोन बॅंकिंगवर प्राधान्याने सेवा उपलब्ध करून देत असतात.

कार्ड ब्लॉक झाले की नाही?:
हॅकिंगची तक्रार मिळताच बॅंक किंवा कार्ड कंपनी कार्डला तत्काळ ब्लॉक करते. अर्थात आपल्याला कस्टमर केअरला पुन्हा चौकशी करून कार्ड ब्लॉक झाल्यासंबंधी खातरजमा करून घ्यायला हवी. जर आपली व्यक्तिगत माहिती लीक झाली असेल तर कार्ड रद्द करणे आणि नवीन कार्ड घेणे योग्य निर्णय ठरू शकतो. त्यानुसार बॅंक आपल्याला नवीन कार्ड पाठवू शकते. यासाठी आपल्याला एक ते दोन आठवडे वाट पाहावी लागेल.

मेल पाठवावा :
आर्थिक फसवणूकप्रकरणी बॅंकेशी केलेल्या कम्युनिकेशनसंबंधी रेफरन्स क्रमांक आपल्याकडे बाळगावा. हेल्पलाइन नंबरवर झालेल्या संवादासंदर्भात बॅंक कस्टमर केअर मेल आयडीवर सूचना पाठवावी. फसवणुकीसंदर्भात सर्व पुरावे, जसे की स्क्रीनशॉट, स्टेंटमेंटची प्रत, इमेल किंवा ऍलर्ट सांभाळून ठेवा. व्यवहाराची तारीख, वेळ ठिकाणी याची नोंद करून ठेवा. कस्टमर केअरशी संवाद साधताना किंवा मेल पाठवताना या गोष्टी हाताशी असणे गरजेचे आहे.

नुकसानीचा दावा :
हॅकिंग प्रकरणातून आर्थिक नुकसान झाले असेल तर काही परिस्थितीत बॅंकेकडून नुकसान भरपाई दिली जाते. अर्थात सूचना देण्यात तीन दिवसांपेक्षा अधिक उशीर होत असेल तर तो पैसा बॅंक किंवा पॉलिसीच्या नियमानुसार जमा करावी लागेल. जर आपली कोणतीही चूक नसेल आणि आपण तीन दिवसांच्या आत बॅंकेला फसवणुकीची माहिती दिली असेल तर आरबीआयच्या नियमानुसार बॅंक या व्यवहाराची चाचपणी करेल. या प्रक्रियेत साधारणत: 120 दिवस लागतात. यादरम्यान आपल्याला नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळेल. आपल्याला पैसे परत मिळवण्यासाठी बॅंकेची संपूर्ण प्रक्रिया फॉलो करावी लागेल. अर्थात तपासात एखादी त्रुटी किंवा चूक राहिली असेल तर आपल्यालाच नुकसान भरपाई द्यावी लागेल.

डेबिट कार्ड हॅक झाल्यास:
– कार्ड हॅक झाल्यास सर्वात अगोदर कस्टमर केअरला फोन करून ते कार्ड ब्लॉक करण्यासंदर्भात सूचना द्यावी. तसेच यासंदर्भातील माहिती बॅंकेलाही कळवावी. कार्ड हरविण्याच्या स्थितीत आपल्याला हीच प्रक्रिया करावी लागेल.
– बॅंकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तत्काळ आपल्या कार्डवरील सर्व सेवा बंद करा.
– ज्या बॅंकेचे एटीएम आहे, त्या बॅंकेच्या शाखेत जाऊन नव्या कार्डसाठी अर्ज करा. लक्षात ठेवा, कार्ड हरविल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करावी लागेल. बॅंकेकडून त्याची प्रत मागितली जाऊ शकते.
– नेटबॅंकिंगचा वापर करत असाल तर खात्याचा पासवर्ड बदला. गरज पडल्यास या खात्यातील रक्कम नेट बॅंकिंगने अन्य खात्यात जमा करा. ही बाब सर्वात सोपी आणि लवकर होणारी आहे.

– अनिल विद्याधर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.