निळवंडे धरणाचे कालवे प्रचलित पद्धतीनेच

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय ः अकोलेचे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही

सहा टक्के पाणी ठेवणार बुडीत क्षेत्रासाठी राखीव

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देण्यासाठी भंडारदरा व निळवंडे धरणाचे संयुक्त व्यवस्थापन करणार असून, अकोले तालुक्‍यातील भंडारदरा व निळवंडे धरणाचे सहा टक्के पाणी बुडीत क्षेत्रासाठी राखीव ठेवणार आहे. तसेच उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देण्यासाठी लेव्हल मेंटेन ठेवण्यात येईल. प्रवरेच्या बारमाही क्षेत्राचे पाणी आहे, त्या-त्या क्षेत्रातील शेतकऱ्याच्या संमतीने ज्याला जसे आवश्‍यक तसे दिले जाईल, असे आश्‍वासन दिले.

अकोले – अकोले तालुक्‍यातील निळवंडे धरणाचे कालवे प्रचलितपद्धतीने (ओपन) होणार असल्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे निळवंडे कालव्यांचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे निळवंडे कालव्यांच्या प्रश्‍नावर बैठक घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभव पिचड यांनी अकोले तालुक्‍यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्या.

या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. वैभवराव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे व खा. डॉ सुजय विखे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिका राजळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सचिव संजय चहल, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांच्यासह जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. पिचड पिता-पुत्रांनी अकोले तालुक्‍यातील कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या बंदिस्त कालव्यांसंदर्भातील भूमिका मांडत तालुक्‍यातील अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मी चुकीचे काम करणार नाही. बंदिस्त कालव्यासाठी 1 हजार 600 कोटी, तर पारंपरिक कालव्यांना 250 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ही बाब किती व्यवहार्य आहे हे सांगा. निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीने सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असून, सरकारवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई होऊ शकते. याबाबत सरकारला विचारणा होईल. तेंव्हा अकोले तालुक्‍याच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

आता सरकारची कालवे सुरू करण्याची मागणी पूर्ण करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला केली.
पारंपरिक कालव्यांसाठी अकोले तालुक्‍यात संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी कालव्यांना जेवढी लागते तेवढीच घेऊन उर्वरित जमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी करारावर देण्याचा विचार करू, असे सांगत विना पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरू करा, असा आदेश देत अकोले तालुक्‍यातील प्रश्नांसंदर्भात लक्ष घालू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

याशिवाय प्रवरा नदीपात्रातील प्रस्तावित ‘प्रोफाइल वॉल’ला केंद्रीय जलआयोगाची परवानगी असताना त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार, म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार, पिंपरकणेचा उड्डाणपूल 2020 पूर्ण करणार, उच्चस्तरीय कालव्यांतून 20 मार्च पर्यंत पाणी मिळणार, पिंपळगाव खांड धरणाचे लाभक्षेत्र हे आभाळवाडी (ता. संगमनेर)पर्यंतच असल्याने त्याव्यतिरिक्त पाणी सोडू नये, बिताका प्रकल्पाला गती देणार, कालव्यांसाठी ज्या जमिनी संपादित केल्या त्या कमी जमिनीच्या वापरात करणार, माळेगाव व केळुंगण उपसा सिंचन योजनांच्या निविदा काढणार, बंद पडलेल्या शासनाच्या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाणी वापर संस्था सुरू करून त्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्या दुरुस्त करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. निळवंडे धरणग्रस्तांच्या शासकीय जमिनी त्वरित नावावर करण्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला.

अगस्ती कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, राजेंद्र डावरे, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, भाकपचे नेते कॉ. शांताराम वाळुंज, अमृतसागरचे संचालक गोरक्ष मालुंजकर, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, राहुल देशमुख, विठ्ठलराव आभाळे, आनंदराव वाकचौरे, खंडू वाकचौरे, शंकरराव वाळुंज, रावसाहेब दौंड, बाळासाहेब घोडके, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, शिवाजीराव धुमाळ, जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉ. किरण लहामटे, सदस्या सुनीता भांगरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, धनंजय संत, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, बाजीराव दराडे, माधवराव तिटमे, विनोद हांडे, विकास वाकचौरे, भाऊसाहेब आभाळे, श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, कॉंग्रेसचे सचिन गुजर, अशोकराव थोरे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, संगीता जगताप उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)