मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलण्याचा विखे पाटलांचा डाव- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: गृहनिर्माण मंत्री झाल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई शहरातील म्हाडाच्या इमारती शहराबाहेर बांधण्याचे आदेश दिले. यातून विखे पाटील यांनी मुंबईकरांच्या अस्तित्वालाच सुरुंग लावल्याची टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली.

याविरोधात घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुंबई शहरातील मराठी माणसाला शहराबाहेर ढकलण्याचा डाव होत असल्याची शंका मातेले यांनी यावेळी उपस्थित केली. मराठी माणसाच्या खिशाला मुंबई शहरात खोली घेणे परवडणार नाही म्हणून ५० किलोमीटर लांब म्हाडाच्या इमारती बांधण्याची व्यवस्था करावी, असे आदेश विखे यांनी काढले.

विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेता असताना केवळ साटं-लोटं करण्याचं काम केले. अशा नेत्याने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो असे मातेले म्हणाले. मुंबई शहरात मराठी माणसाच्या हितासाठी म्हाडा ही शासकीय संस्था उभारण्यात आली. मराठी माणसावर जर त्याला शहराबाहेर काढून अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही असे इशारा मातेले यांनी दिला. आज पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला अल्पसंख्याक विभागाचे मुंबई शहर अध्यक्ष सोहेल सुभेदार, घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव व तालुका कार्याध्यक्ष अन्वर दळवी यांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.