राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी मोदींची एकमताने निवड

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात “एनडीए’च्या नव्याने निवडून आलेल्या खासदारांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून आणि भाजप संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये “एनडीए’च्या 353 खासदारांनी “मोदी, मोदी, मोदी’ अशा घोषणा देऊन वातावरण मोदीमय करून टाकले. आता भाजप आणि आघाडीच्यावतीने मोदी हे नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा राष्ट्रपतींकडे करतील.

गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेमध्ये पहिल्यांदाच निवडून गेलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस केली. त्याला राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. मोदी यांन भाजप संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडण्यात आले असल्याची घोषणा अमित शहा यांनी केली.

त्यानंतर अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांनी “एनडीए’च्यावतीने नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला संयुक्‍त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान, अद्रमुकचे नेते आणि मुख्यमंत्री ई पलानीस्वामी, नागालॅन्डचे मुख्यमंत्री निफू रिओ आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी अनुमोदन दिले.

“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भाजप संसदीय पक्षाने नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षनेतेपदी निवड झाली आहे आणि “एनडीए’च्या नेतेपदीही त्यांची एकमताने निवड झाली आहे.’ असे प्रकाश सिंग बादल यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)