ही निवडणुक म्हणजे तीर्थयात्रा पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली – जेव्हा विश्वासाचा धागा मजबूत होतो; तेव्हा सत्ताधारी पक्षाची लाट येते. ही लाट विश्वासाच्या धाग्याशी बांधलेली आहे. ही निवडणूक सकारात्मक मतांची आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत संबोधित करताना व्यक्त केले.

मी अनेक निवडणुका पाहिल्या. पराभव, विजय अनुभवले. मात्र, 2019 मधील निवडणूक ही माझ्या जीवनातील तीर्थयात्रा आहे. लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत भाजपला जेवढे मतदान मिळाले त्यात 2019 मध्ये वाढ झाली. ही वाढ सुमारे 25 टक्के आहे.

नरेंद्र मोदींनी स्वत:ला आव्हान केले होते. ते आव्हान स्वीकारले आणि 2019 साली झालेल्या निवडणुकीत 2014 सालचे सर्व रेकॉर्ड मोडले. मी नव्या भारताच्या संकल्पनेला सुरुवात करत आहे. मी तुमच्यातीलच एक असून आपल्याला खांद्याला खांदा लावून चालायचे आहे. 2014 ते 2019 जनतेने सरकार चालवले आहे. जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. देशाची लोकशाही परिपक्व होत आहे. प्रचंड जनादेश मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. लोक मला म्हणतात की मत मागण्यासाठी दौरे केले. परंतु, मी मत मागण्यासाठी दौरे केले नाहीत. 2019 ची निवडणुकीत केलेले दौरे तीर्थयात्रेसमान होते. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार झाल्या आहेत. या निवडणुकीत मातृशक्तीने देशाचे भविष्य ठरवले आहे.

आचार्य विनोबा भावे म्हणायचे की निवडणुका विभाजनाचे काम करतात. दुरावे वाढतात, भिंती तयार होतात आणि लोकांमध्ये दरी निर्माण होतात. परंतु, 2019 च्या निवडणुकीने मने जोडण्याचे काम केले आहे. ही निवडणूक सामाजिक एकात्मतेचे आंदोलन बनली होती. समता आणि मता देखील. समभाव आणि मम भाव सुद्धा. भारताच्या लोकशाही जीवनात देशाच्या जनतेने एका नव्या युगाचा आरंभ केला आणि त्याचे आम्ही साक्षीदार बनलो, असे मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.