माण तालुक्यात पोलिसांची कारवाई
म्हसवड – माण तालुक्यातील एका गावात दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञाताने निर्जनस्थळी नेऊन आत्याचार केला व तिच्यासह लहान दोन भावंडाना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरीकांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी संशयिताला 24 तासात ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या दहा वर्षीय बालिकेला घरी सोडण्याच्या बहाण्याने संशयिताने दुचाकीवरुन निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिच्यासोबत असलेल्या लहान भावंडाना हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन पलायन केलेल्या नराधमाचा पोलीसांकडून तपास सुरु होता. पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध करुन शोध सुरु होता. म्हसवड पोलिसांनी एकूण 17 संशयितांना ताब्यात घेत ओळख परेड घेतली.
शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयिताचा शोध घेतला. यावेळी अत्याचारित मुलीच्या लहान बहिणीने तो हाच होता, असे ओळखल्याने संबंधित संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी, कपडे,वडापावची पिशवी पोलिसांनी हस्तगत केली आहे. संबंधित संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या संवेदनशील प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत.