अपात्र उमेदवारांच्या अर्जावर आज सुनावणी

प्रभाग समिती स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी निवड


तब्बल 268 सदस्य ठरले अपात्र

पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून शहरातील 15 प्रभाग समित्यांमधील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी निवडीसाठी सुमारे 268 अर्ज अपात्र ठरले आहे. पालिकेने अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेवरच अनेक उमेदवारांनी थेट आयुक्‍तांकडे लेखी तक्रार करत आक्षेप घेतल्याने, या सदस्यांच्या तक्रारींची बुधवारी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीस क्षेत्रीय अधिकारी, संबंधित झोनचे उपायुक्‍त तसेच विधी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महापालिका अधिनियमानुसार, महापालिकेच्या प्रभाग समितीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे 3 सदस्य नियुक्‍त करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, 2012 मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना डावलून राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याने तसेच या नियुक्‍त्या करण्यास दिरंगाई होत असल्याने स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन महिन्यांत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्या अनुषंगाने पालिकेने 20 ते 30 मे या कालावधीत अर्ज मागविले होते. तर 20 मे 1 जूनपर्यंत अर्जांची स्विकृती होती. तसेच, सुमारे 473 जणांनी अर्ज विकत घेतले होते. त्यातील 353 जणांनी अर्ज सादर केले होते. या एकूण अर्जातील सुमारे 85 जण पात्र झाले आहेत.

तर उर्वरीत उमेदवार धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या संस्थेचा कार्य अहवाल सादर करू न शकल्याने अपात्र ठरविण्यात आले आहेत. मात्र, या निवडीसाठीच्या पात्रतेच्या यादीत धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून केवळ संस्थेचे 3 वर्षांचे ऑडीट तपासणी अहवाल सादर करण्याचा उल्लेख असून प्रशासनाने आयत्यावेळी उमेदवारांना कार्य अहवाल मागितला. त्यामुळे अर्जाची मुदत संपण्यापूर्वी अनेकांना हे कार्य अहवाल देता आले नसून नियमात नसलेल्या कागदपत्रांची मागणी केल्याचा आक्षेप बहुतांश सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे या आक्षेपावच बुधवारी सुनावणी होणार असून या सुनावणीत गोंधळ होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here