स्पिरिट ऑफ क्रिकेट

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक खेळाडू आहे. मैदानावर तो अनेकदा आक्रमक होतो आपल्या संघातील खेळाडूने कॅच सोडला, फिंल्डिंग करताना चेंडू व्यवस्थित आडवला नाही, रन आऊटची संधी गमावली किंवा बॉलर ने जास्त धावा दिल्या तर तो मैदानातच त्यांची खरडपट्टी काढतो. आपला संघ जिंकावा खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी यासाठी तो संघाला नेहमीच प्रेरित करीत असतो. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू बाद झाल्याचा आनंद साजरा करण्याची त्याची विशिष्ट अशी शैली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या डोळ्यात डोळा घालून त्याला खुन्नस देण्यातही तो कमी पडत नाही यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूशी अनेकदा पंगा झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. त्याचा या आक्रमक स्वभावामुळे क्रिकेटविश्‍वात त्याची खडूस अशी प्रतिमा तयार झाली आहे पण या प्रतिमेला छेद देणारी घटना वर्ल्ड कप मधील भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात घडली.

या सामन्यात कोहली फलंदाजी करीत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्टीव्ह स्मिथची भारतीय प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. चेंडू कुरतडल्याची शिक्षा म्हणून स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आयसीसीने एका वर्षाची बंदी घातली होती. ही बंदी नुकतीच संपली असल्याने या दोघांनी आता पुनरागमन केले आहे. त्यांची बंदी उठली असली तरी मैदानात प्रेक्षक मात्र त्यांची हुर्यो उडवत आहेत. वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वार्नर यांना सातत्याने अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवणे कर्णधार कोहलीला सहन झाले नाही अखेर कोहलीनेच प्रेक्षकांना खडसावले आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्याचा इशारा केला इतकेच नाही तर यानंतर कोहलीने स्वतः स्टीव्ह स्मिथची माफी मागितली. त्याच्या या खिलाडूवृत्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अनेक आजी माजी खेळाडूंनी विराटच्या या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आहे.

आयसीसीने हि त्यांच्या अधिकृत ट्‌विटर हॅन्डलवरुन विराटचा प्रेक्षकांना खडसवण्याचा व स्टीव्ह स्मिथसाठी टाळ्या वाजवण्याचा इशारा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक करुन व्हिडिओ रिट्‌विट करुन विराटच्या खिलाडूवृत्तीला दाद दिली आहे. पत्रकार परिषदेतही विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथचे समर्थन करीत प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवणे योग्य नसल्याचे सांगितले. स्मिथ हा महान खेळाडू आहे त्याच्याकडून चूक झाली त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे, आता प्रेक्षकांनी ते विसरून स्मिथला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्याने केले. विराट कोहलीची हि खिलाडूवृत्ती नुसतीच कौतुकास्पद नसून अनुकरणीयही आहे. प्रेक्षक स्मिथ वार्नर यांची प्रेक्षक हुर्यो उडवीत असताना इतर देशाचे कर्णधार बघ्याची भूमिका घेत होते विराट कोहलीने जी खिलाडूवृत्ती दाखवली ती अभिमानास्पद आहे. विराट कोहलीने आपल्या कृतीतून भारतीय क्रिकेटची उंची आणखी वाढवली आहे, त्याच्याबद्दल असलेला आदर आणखी वाढला आहे.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Leave A Reply

Your email address will not be published.