व्हॅलेंसियाचा कोपा डेल रे चषकावर मोहोर

बार्सिलोनाचा 2-1ने पराभव करत विजेतेपदावर कब्जा

नवी दिल्ली – कोपा डेल रे चषकाच्या अंतिम सामन्यात व्हॅलेंसियाने बार्सिलोनाला 2-1 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. सलग पाचव्यांदा कोपा डेल रे चषकाचे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालेल्या बार्सिलोनाला व्हॅलेंसियाने सुरुवातीलाच दोन गोल करत अडचणीत आणले. त्यानंतर अखेरच्या क्षणी लिओनाल मेसीने गोल करत बार्सिलोनाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पण त्यानंतर गोल करण्याच्या अनेक संधी बार्सिलोनाने वाया घालवल्या.

2008 मध्ये या स्पर्धेचे अखेरचे जेतेपद पटकावणारा व्हॅलेंसिया संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असतानाच त्यांना या मोसमात फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. केव्हिन गामेरो याने 21व्या मिनिटाला पहिला गोल करत व्हॅलेंसियाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रॉड्रिगो याने 33व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची भर घालत ही आघाडी 2-0 अशी वाढवली.

मार्क-आंद्रे टेर स्टेगान, लुइस सुआरेझ आणि औसमाने डेम्बेले या जायबंदी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाची भिस्त मेसीवर होती. मेसीनेही 73व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले. त्यानंतर संधी मिळूनही बरोबरी साधणारा गोल करता न आल्याने बार्सिलोनाला पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)