दुधेबावी – नायगाव ता. खंडाळा येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर वडिलांसोबत मयुरी बोराटे घरी परतत असताना सुरवडी ता. फलटण मोटार सायकल अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वडिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून मयुरी बोराटे हिचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये या उद्देशाने माण शिक्षक प्रतिष्ठान यांच्यावतीने तिला मदतीचा हात दिला आहे. बिदाल ता. माण येथील कु. मयुरी बोराटे हीने इयत्ता 10 वी परिक्षेमध्ये 98.66 टक्के गुण मिळविले.
नायगांव ता. खंडाळा येथील एका सत्कार समारंभास उपस्थित राहून घरी कोळकी ता. फलटण येथे परतत असताना फलटण लोणंद रोडवर सुरवडी ता. फलटण येथील कमिन्स कंपनीसमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. वडील श्रीपती बोराटे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बोराटे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून त्यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे. एका खासगी शाळेमध्ये श्रीपती बोराटे क्लार्क म्हणून काम करीत आहेत.
मुलीला मिळालेल्या दहावी परीक्षेतील गुणांचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांच्या व कुटुंबावर अपघाताच्या घटनेने आभाळ कोसळले आहे. मयुरी बोराटे हिचे पुढील शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. माण तालुक्यातील माण शिक्षक प्रतिष्ठानने रोख 20 हजार रुपयांची मदत देवून शिक्षणासाठी आधार दिला आहे.
यावेळी माण शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्रशांत जगताप, लोखंडे, रवी परमाळे, सुभाष गोंजारी, शैलेंद्र साळुंखे, अरविंद आघाव, अमोल निकम यांच्यासह माण शिक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.