नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे. त्याविषयीच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राष्ट्रपती राजवटीसाठीची नवी मुदतवाढ 3 जुलैपासून लागू होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युतीचे सरकार होते. Extension to the President’s rule in Jammu and Kashmir
भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने पीडीपीच्या नेतृत्वाखालील ते सरकार कोसळले. त्यानंतर 20 जून 2018 पासून त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्या राजवटीची मुदतवाढ लागू होईल. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक केव्हा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन तेथील राजकीय पक्षांनी तयारीही सुरू केली आहे.