कलंदर : अवघड सोपे झाले?

-उत्तम पिंगळे

काल प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर ते स्वतःशीच बडबडत फेऱ्या मारत होते. काय पुस्तक लिहिणाऱ्याचे डोके ठिकाणावर आहे की नाही? मला समजून आले. मला पाहताच ते बसले; पण तावातावाने बडबडत राहिले. मी त्यांना म्हणालो सर, जरा शांत राहा. काय सांगायचे तर मला सविस्तर सांगा.

त्यावर सर म्हणाले, दुसरीच्या नवीन पुस्तकातील संख्या मोजणीवरून जो गदारोळ उठला आहे त्यावर मी बडबडत होतो. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत. इतकी वर्षे आपण मराठी संख्या बोललो आणि आता म्हणे त्या सोप्या करणार आहेत? बहुतेकजण आता बऱ्यापैकी संख्या बोलत असताना हा नसता उपद्‌व्याप करायला कोणी सांगितले ते समजत नाही. आपण समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहोत, तेच समजत नाही.

मग जरा दम घेऊन मला म्हणाले, हे पाहा तुम्हाला माहीत आहे की मानवाचा मेंदू अगदी जास्तीतजास्त 4 ते 5 वर्षांपर्यंत चांगला विकसित होत असतो. त्या कालावधीत त्याच्या सभोवार जे काही घडत असते किंवा संस्कार होत असतात ते चिरकाल राहतात. अलीकडे आपण पाहतोच की मूल जन्माला येण्याअगोदर गर्भ संस्कारही केले जातात. ज्यामध्ये विविध श्‍लोक, संगीत असे विविध प्रकार ऐकवले जातात. गर्भावर त्याचे निश्‍चित चांगले संस्कार होतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. अहो एवढेच काय आपण अभिमन्यूची कथा ऐकली असेलच. त्याला चक्रव्यूह कसा भेदायचा ते गर्भातच समजले होते. सांगण्याचे कारण हे की, असे असताना आपण सोपी भाषा म्हणून इंग्रजीप्रमाणे मराठी अंकही फोड करून बोलणार आहोत का? काय तर म्हणे पंचाहत्तर म्हणजे सत्तर पाच वगैरे. जसे इंग्रजी मध्ये ट्‌वेंटी टू, ट्‌वेंटी थ्री असे असते त्याचप्रमाणे मराठीमध्येही करण्याचा हा अघोरी प्रयत्न आहे, असे माझे ठाम मत आहे.

आज आपण पाहतो तो शहरातच काय, पण गावागावांतून अगदी दोन वर्षांपासून शाळा (म्हणजे डबा खाणे, गाणी-गोष्टीसाठी) घेतल्या जातात. त्यावेळी मुलांना हळूहळू स्वतःची स्वच्छता, रंग, गाव, फळे, प्राणी, पक्षी व फुले यांची तोंडओळख होत असते. अशामुळे पुढे खरोखरच्या शाळेमध्ये हे सर्व सोपे जाते असे म्हटले जाते. नवी पिढी अधिकाधिक चौकस होत असताना असे धोरण आणणे चुकीचे आहे. मान्य आहे अजून कित्येक जणांना तसे शब्द उच्चारता येत नाहीत. पण जे शिक्षक आहेत त्यांना तर व्यवस्थित ट्रेनिंग देऊन तसे करून घेणे सरकारचे काम आहे.

नव्या पिढीची आकलनशक्‍ती वाढत असताना सोप्याच्या नावाखाली मूर्खपणा चालवला आहे, तोही गणित विषय निवडून. उद्या मग इतिहासामध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा अठराशे सत्तावन ऐवजी एक हजार आठशे पन्नास सात असे म्हणावयाचे आहे काय? आकडे व्यवस्थित बोलता यावेत याकडे लक्ष न देता त्यांना दुसरे फोड करून नामकरण करणे अत्यंत चुकीचे असून यावर सर्वांनीच सरकारला धारेवर धरणे आवश्‍यक आहे. असे करावयाचे असेल तर मग पाढ्यांचे काय? पूर्वी तीसपर्यंत पाढे आवश्‍यक होते. चोवीस चोक शहाण्णव ऐवजी वीस चार चोक नव्वद सहा याचाही निकाल लावावा. एकीकडे आपण अवकाशात आपले स्थानक निर्माण करत असताना मूलभूत व पायाभूत अभ्यासाचा बोजवारा तर उडवत नाही ना?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)