कराड उत्तरेत शिवसैनिकांची फिल्डिंग

कराड – विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. कराड उत्तर मध्ये यानिमित्ताने इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. महायुतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी राखीव. मात्र लोकसभेनंतर महायुतीत आयारामांची संख्या वाढण्याच्या शक्‍यतेने उमेदवारी मिळवण्यासाठी आत्ताच शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली आहे.

विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यामुळे येणाऱ्या विधानसभेला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी राज्यातही जबरदस्त परफॉर्मर्स द्यायचा, अशी ध्येय ठेवून महायुती निवडणुकीत उतरेल यात शंका नाही. विधानसभा निवडणुकीत पारंपरिक लढती बऱ्याच ठिकाणी यावेळीही पहावयास मिळतील. कराड उत्तर देखील त्यापैकीच एक. येथे गेली दशकापासून याच जागेवर सेनेचा हक्क आहे, तर कराड दक्षिण मध्ये भाजपचा. गेले दोन दशकापासून येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. येथील आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग चार वेळा येथून निवडणूक जिंकली.

मागील निवडणुकीत युती व आघाडी वेगवेगळ्या लढल्याने येथे चौरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील, कॉंग्रेसकडून धैर्यशील कदम, शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांनी ही निवडणूक लढवली. भाजपने मात्र येथे स्वतःचा उमेदवार न देता मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मतदारसंघ सोडला. त्यांचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी देखील चांगली मते या मतदारसंघातून मिळवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युती-आघाडी करण्यात आली. हाच फॉर्म्युला विधानसभेसाठी ही असेल हे जवळजवळ निश्‍चित मानले जाते. युती व्हावी असे वरिष्ठ राजकीय नेत्यांना वाटते, मात्र त्या मतदारसंघातील नेत्यांना मात्र निवडणूक वेगवेगळी लढवावी असे वाटत असते. कारण युती किंवा आघाडी झाल्यास तिकीट मिळण्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात.

आता तर भाजप-सेना लोकसभेतील यश मिळाल्याने त्यांनी त्यांचे विधानसभेचे इरादे स्पष्ट केले आहेत. राष्ट्रवादीसह कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. रोज कोणता ना कोणता कार्यकर्ता, नेता पक्ष बदलत आहे. मात्र या आयाराम-गयाराम यांच्या येण्याने स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र सतरंज्या उचलाव्या लागतील की काय, अशी स्थिती आता झालेली आहे.
कराड उत्तर मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे. तर तिकडे सेना-भाजप युतीत हा मतदारसंघ सेनेसाठी राखीव आहे. त्यामुळे नेमके या मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काहीही करून निष्ठावंत शिवसैनिकालाच या मतदारसंघातून तिकीट मिळावे, यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहेत.

मात्र तिकीट अशा माणसाला द्यायचे की तो तेथून निवडून आला पाहिजे, असेच ध्येय युतीने ठेवले आहे. त्यातच येथे ऐनवेळी आयाराम-गयारामाची संख्या वाढल्यास निष्ठावंत शिवसैनिकांची गोची होण्याची भीती शिवसैनिकांमध्ये आहे. याआधी 2009 च्या निवडणुकीत सेनेकडून वासुदेव माने यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. तसेच नरेंद्र पाटील हे 2014 ला निवडणुकीला उभे राहिले खरे, मात्र ते चार नंबर वर फेकले गेले. कराड उत्तर मध्ये सेना बळकट नाही, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट दिल्यास कितपत यश मिळेल याबाबत शंका व्यक्त होत आहे.

म्हणून अन्य पक्षाच्या इच्छुक उमेदवाराला आपलेसे करण्यात सेनेला यश आले, तर या मतदारसंघात देखील भगवा फडकेल असा विश्‍वास सेनेला आहे. मात्र काहीही करून या जागेवर निष्ठावंत शिवसैनिकालाच तिकीट मिळावे यासाठी शिवसैनिकांनी वरिष्ठांची मनधरणी सुरू केली आहे. शिवसैनिकांचा प्रयत्न सफल होतो, की आयाराम-गयारामाला उमेदवारीची लॉटरी लागते याचे उत्तर काही दिवसातच कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.