झेडपी सीईओच्या दालनासमोर पारधी समाजाचे आंदोलन

सातारा – सातारा तालुक्‍यात लिंब, राजेवाडे, विजयनगर येथील पारधी समाज्यातील लोकांना राहत्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेकवेळा निवेदने दिली होती. त्याबाबत कोणत्याही प्रकार कार्यवाही केली नसल्याच्या निषेधार्थ लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समिती सातारचे उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या केबिन बाहेर प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केले. सीईओ डॉ. कैलास शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती उमेश चव्हाण यांनी दिली.

लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समिती सातारचे उमेश चव्हाण यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शासन एका बाजूला वंचित घटकाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी योजना राबवते आहे. सर्वांसाठी घरे ही एक योजना आहे. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने ज्यांना घर नाही, ज्यांना दार नाही, ज्यांना स्वतःची जमीन नाही, अशाना मिळाला पाहिजे. सातारा तालुक्‍यातील पारधी समाज या योजनेपासून कोसो दूर राहिला आहे. उपेक्षित, वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. लिंब, विजयनगर या गावात हा समाज राहत आहे.

समाजाला घरकूल मिळावे म्हणून वारंवार अर्ज विनंत्या प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने कोणती ही दखल घेतली नाही. हक्काचे स्वतःचे घर मिळणार या भोबड्या आशेवर हे अजून आहेत. नेमका घरकूल योजनेचा लाभ द्यायला अडचण काय आहे. कार्यवाही होत नाही. याच्या निषेधार्थ आज भीक मागो आंदोलन केले. सीईओ डॉ. शिंदे यांनी चर्चा करण्यासाठी केबीनमध्ये बोलवले. त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. संघटनेच्या महिलांनी आपली व्यथा त्यांच्याजवळ मांडली. त्यांनी आश्‍वासन दिल्याने आम्ही आंदोलन स्थगित केले, असे चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.