जिल्हा बॅंकेला 105 कोटींचा नफा

संग्रहित छायाचित्र

 आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती  68 वर्षाच्या कालखंडातील विक्रमी कामगिरी

गैरव्यवहार करणाऱ्यांना शासन होणारच

जिल्हा बॅंकेच्या देऊर, दहिगाव, पळशी आणि फलटण येथे गैरव्यवहारांच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. ज्यांनी गैरव्यवहार केले संबधित अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, बॅंकेत असले गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. जो असे प्रकार करेल त्यांना शासन होणारच, असे त्यांनी सांगितले. तर मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे म्हणाले, पळशी शाखेतील निम्मी तर देऊर व दहिगाव शाखेतील रक्कम पुर्ण वसूल करण्यात आली आहे.

सातारा – सहकार क्षेत्रात राज्यात नाव लौकीक प्राप्त केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सन 2018-19 आर्थिक वर्षात तब्बल 105 कोटी रूपयांचा नफा प्राप्त केला आहे. बॅंकेच्या 68 वर्षाच्या कालखंडात प्रथमच बॅंकेने 100 कोटींचा टप्पा पार केला असून सन.2019-20 आर्थिक वर्षात देखील नफा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

बॅंकेच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उपाध्यक्ष सुनील माने, संचालक सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बॅंकेला करपूर्व 126 कोटी 54 लाख रूपयांचा नफा झाला आहे. त्यातून 21 कोटी 18 लाख रूपये आयकर भरण्यात आला असून अंतिम नफा 105 कोटी 36 लाख रूपये नफा झाला आहे. नफ्याचा एवढा मोठा टप्पा गाठण्यामध्ये कर्जदार, सोसायटी, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. बॅंकेने ठेवीचा 7 हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून मार्च अखेर बॅंकेकडे 7 हजार कोटी 35 लाख 16 हजार रूपयांच्या ठेवी आहेत. मार्च अखेरपर्यंत ढोबळ एनपीए प्रमाण 0.14 तर निव्वळ एनपीए शून्य ठेवण्यात आला आहे.

या कामगिरीबद्दल आरबीआय व नाबार्ड यांनी सन्मानित केले आहे. भाग भांडवलामध्ये 31 कोटींनी वाढ होवून 197 कोटी इतके झाले आहे. बॅंकेने शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी यंदा 1 कोटी 27 लाख रूपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून मध्यम कर्जावरील व्याजामध्ये 5 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 2 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास संस्थांच्या गोडावून व इमारत बांधकामासाठी शून्य टक्के व्याज दरासाठी 41 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. बॅक व संस्था पातळीवर शंभर टक्के वसूली करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी अनुक्रमे 29 हजार 500 व 15 हजार वसूली प्रोत्साहन निधीची शिफारस करण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना साडे तीन लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 17 हजार 986 महिला बचतगटांना 26 कोटी 81 लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. कोअर बॅंक प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांसाठी रूपे डेबिट कार्ड, केसीसी कार्ड, एनईएफटी, आरटीजीएस, मोबाईल बॅंकींग, इंटरनेट बॅंकींग, एसएमएस अलर्ट आदी. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध ठिकाणी 29 एटीएम कार्यन्वित करण्यात आली असून 650 मायक्रो एटीएमच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम भागातील ग्राहकांना घरपोच बॅंकीग सुविधा पुरवली जात आहे. नजीकच्या काळात 100 एटीएम कार्यन्वित करण्याची योजना आखण्यात आली आहे, असे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)