नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत “पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट आता 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वप्रथम 11 तारखेला म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणुकीच्या वेळी प्रदर्शित होणार म्हणून या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती.
हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे निवडणुकीच्या काळात असे चित्रपट त्यांच्या साठी पोषक असतात, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. ‘लोकसभा निवडणुक सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी आणि त्यामुळे निवडणूक निकालानंतर चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यामुळे अखेर या चित्रपटाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे निर्माते संदीप सिंग यांनी सांगितले.
अखेर पी एम नरेंद्र मोदी चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे. येत्या 24 मे ला हा चित्रपट भारतभर प्रदर्शित होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेता मनोज जोशी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.